मडगाव: दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची दावेदारी वाढू लागली असून वालंका आलेमाव यांनीही या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर आपला दावा दाखल केला आहे. वालंका आलेमाव यांनी उमेदवारीसाठी केलेला अर्ज गोव्याचे काँग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हा समितीकडे पाठवून दिला आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, वालंका आलेमाव यांनी आपला अर्ज प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात पाठवून दिला होता. त्याशिवाय एक प्रत डॉ चेल्लाकुमार यांना पाठवून देण्यात आली होती. वालंका आलेमाव यांच्याही अर्जावर विचार करा अशा सूचना डॉ. चेल्लाकुमार यांच्याकडून आल्यामुळे यासंबंधी चर्चा करण्यासाठी लवकरच दक्षिण गोवा कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे समजते.
यापूर्वी दक्षिण गोवा समितीने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो तसेच काँग्रेसचे प्रदेश समितीचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव ही चार नावे प्रदेश समितीकडे पाठविली होती. मात्र आता त्यात या पाचव्या नावाची भर पडली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले वालंकाचे वडील चर्चिल आलेमाव यांच्याशी संपर्क साधला असता, दक्षिण गोव्यासाठी आपण योग्य उमेदवार ठरणार असे म्हटल्यामुळेच वालंकाने हा अर्ज केला आहे. यापुर्वी वालंकाने गोव्यात युवा काँग्रेसची अध्यक्ष या नात्याने संपूर्ण राज्यात कार्यकत्र्याची फळी उभारली होती. सध्याच्या परिस्थितीत वालंका याच यासाठी योग्य उमेदवार आहेत असे आलेमाव म्हणाले.