पणजी : अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेच्या विषयावर गोवा विधानसभेत विरोधकांनी अर्थसंकल्पाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला असता सभापती राजेश पाटणेकर यानी मार्शलकरवी दहाही विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढले. मुख्यमंत्र्यांनी या गदारोळातच अर्थसंकल्पाचे वाचन केले. तत्पूर्वी विरोधकांनी गदारोळ माजविल्याने चारवेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
दुपारी ३ वाजता विधानसभेचे कामकाज सुरु झाले तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहिले असता विरोधी आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे, आमदार आलेक्स रेजिनाल्द लॉरेन्स, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुइझिन फालेरो, जयेश साळगांवकर, विनोद पालयेंकर व आमदार सुदिन ढवळीकर ‘शेम, शेम’ अशा घोषणा देत सभापतींच्या आसनापर्यंत गेले. तेथे मार्शलनी कडे करुन त्यांना रोखले. गोंधळ घालू नका, अर्थसंकल्पाचे कामकाज सुरळीतपणे चालू द्या असे आवाहन सभापतींनी किमान चारवेळा केले. कामकाज रोखण्याची कृती मागे घ्या अन्यथा एकेका आमदाराचे नाव घेऊन सभागृहाबाहेर काढावे लागेल, अशी ताकीद सभापतींनी दिली परंतु त्यांचे काहीही न ऐकता विरोधकांना जोरजोरात घोषणाबाजी चालूच ठेवली. या गदारोळातही मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे वाचन चालू होते. अखेर सात ते आठ मिनिटांनी सभापतींनी मार्शल बोलावून या दहाही आमदारांना सभागृहाबाहेर काढले. खंवटे, रेजिनाल्द यांनी मार्शलना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ढकलाढकलीही झाली. विरोधकांच्या अनुपस्थितीत प्रथमच मुख्यमंत्र्यांकडून बजेट मांडले गेले.
चार वेळा कामकाज तहकूबसकाळच्या सत्रात तीनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी २.३0 वाजता दुसऱ्या सत्रातील कामकाज सुरु झाले तेव्हा ‘शेम, शेम’ अशा घोषणा देत सर्व विरोधी आमदार सभागृहाच्या हौद्यात उतरुन सभापतींच्या आसनापर्यंत गेले. या गदारोळात सभापतींनी माजी आमदार श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारा ठराव तसेच आमदार बाबुश मोन्सेरात, आमदार टोनी फर्नांडिस आणि आमदार फ्रान्सिस सिल्वेरा या तिघांनी माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण दिल्याबद्द्दल अभिनंदनाचा ठराव संमत केला व कामकाज पुन्हा दुपारी ३ पर्यंत तहकूब केले.
न्याय मिळेपर्यंत कामकाज रोखणार’दरम्यान, ज्या आमदारांना सभागृहाबाहेर काढले त्यात चार माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री यांचाही समावेश होता. हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच त्यांच्या सहकारी विरोधी आमदारांनी नंतर पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, ‘गोवा विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पाच्यावेळी विरोधी आमदारांना मार्शल वापरुन सभागृहाबाहेर काढले. खंवटे यांच्याविरुध्दची तक्रार बोगस आहे आणि उलट तक्रारदारावर कारवाई व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. उद्या विधानसभेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्या काय भूमिका असणार आहे, असा प्रश्न केला असता न्याय मिळेपर्यंत आम्ही कामकाज रोखून धरणे चालूच ठेवणार आहोत, असे सरदेसाई यांनी सांगितले.