पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर व अनेक महिन्यांच्या आजारामुळे प्रशासन ठप्प झाल्याने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीबाबत अत्यंत नकारात्मक भावना गोव्याच्या जनमानसात निर्माण झालेली आहे. सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष आणि भाजपाचेही अनेक पदाधिकारी कंटाळलेले आहेत. पाच राज्यांचा निवडणूक निकाल झाल्यानंतर भाजपाचे केंद्रीय नेते गोव्याच्या राजकारणात लक्ष घालतील व येथे नेतृत्व बदल घडवून आणतील, अशी चर्चा सुरू आहे.
पर्रीकर गेले नऊ महिने आजारी आहेत. नऊ महिन्यांपैकी बहुतांशवेळ त्यांचा रूग्णालयात गेला. ते करंजाळे येथील त्यांच्या खासगी निवासस्थानीच असतात. पर्रीकर यांच्या कार्यक्षमतेचे एकेकाळी गोव्यात कौतुक व्हायचे पण त्यांच्या आजारामुळे प्रशासनावर खूप मोठा परिणाम झाल्याने खुद्द सरकारमधील मंत्री व आमदारही प्रशासन ठप्प झाल्याची जाहीर टीका करत आहेत. महसुल मंत्री रोहन खंवटे, सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर, उपसभापती मायकल लोबो आदींनी प्रशासन ठप्प झाल्याचा सूर सातत्याने आळवला आहे. प्रशासनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे असे यापूर्वी कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनीही वारंवार नमूद केले. मुख्यमंत्रीपदाचा ताबा जर दुसऱ्या एखाद्या मंत्र्याकडे सोपविला गेला तर प्रशासनाची गाडी पुढे जाऊ शकेल, असे मगो पक्षाला वाटते.
सत्ताधारी भाजपाच्याही कोअर टीमच्या काही सदस्यांचे म्हणणे तसेच आहे. मात्र पर्यायी नेतृत्व भाजपामधीलच असावे असा आग्रह पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलेला आहे. पाच राज्यांचा निवडणूक निकाल जर भाजपाला अनुकूल लागला तर गोव्यातील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांची शक्ती कमी होईल पण निकाल जर भाजपाविरोधी ठरला तर पर्रीकर सरकारमधील घटक पक्षांची ब्लॅकमेलिंगची ताकद वाढू शकते. यामुळे पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे गोवा प्रदेश भाजपाचे लक्ष आहे. निवडणूक निकालानंतर गोव्यात नेतृत्व बदल होईल, असेही मानले जात आहे.
दरम्यान, एरव्ही सरकारवर थेट टीका करणे टाळणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनीही घरी खाटवर झोपून सरकार चालविता येत नाही, अशी टीका नुकतीच जाहीरपणे काँग्रेस सभेवेळी बोलताना सरकारवर केली. राणे हे काँग्रेस नेते असले तरी, त्यांचे पुत्र विश्वजित राणे हे पर्रीकर मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाचे विश्वजित राणे हेही एक दावेदार मानले जातात.