पणजी - गोव्यात मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयीच्या खटल्यांबाबत सुनावणी घेऊन खटले लवकर निकालात काढण्यासाठी दोन खास जलदगती न्यायालये लवकरच स्थापन केली जाणार आहेत. केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी तशी ग्वाही बुधवारी (18 सप्टेंबर) दिल्याचे गोव्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले आहे.
गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजित राणे हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी स्मृती इराणी यांची भेट घेतली व गोव्यासंबंधीच्या विविध प्रस्तावांविषयी चर्चा केली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असून येथे लैंगिक अत्याचाराची प्रकरणे अनेकदा उघडकीस येत असतात. मुलांचे विनयभंग तसेच बाल लैंगिक शोषणाचे गुन्हे पोलिसांत नोंद होतात पण त्याबाबतचे खटले अनेक वर्षे न्यायालयाच्या स्तरावर सुरू राहतात. जर जलदगती न्यायालये सुरू झाली तर अशा प्रकारचे खटले लवकर निकाली निघू शकतील. तसेच आरोपींना देखील कडक शिक्षा होण्यास ते सहाय्यभूत ठरणार आहे.
स्मृती इराणी यांना भेटून आल्यानंतर मंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, निर्भया निधीचा विनियोग करणे तसेच गोव्यात महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्याच्या दृष्टीने आपण स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली आहे. गोव्यासाठी आपण अतिरिक्त शंभर अंगणवाड्या सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मागितले. तसेच बाल लैंगिक अत्याचाराचे खटले निकालात काढण्यासाठी उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात दुसरे जलदगती न्यायालय सुरू केले जाणार आहे. लवकर त्याविषयीचा सविस्तर प्रस्ताव आपल्याकडे पाठवा, असे स्मृती इराणी यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारचे विविध वरिष्ठ अधिकारीही या चर्चेवेळी उपस्थित होते. निर्भया निधीचा विनियोग करणे तसेच गोव्यात महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्याच्या दृष्टीने आपण स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मंत्री विश्वजित राणे म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित करणे, तेथील अर्थव्यवस्थेला हातभार लावतानाच ग्रामीण महिलांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे या दृष्टीकोनातूनही स्मृती इराणी यांच्याशी चर्चा झाली आहे.