पणजी : भारतीय नौदलासाठी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडतर्फे’ (एचएएल) बनविलेल्या ‘एएलएच एमके ३’ या अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा सहा हेलिकॉप्टरचे सोमवारी अनावरण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व संरक्षण दलांचे बळ वाढवण्यासाठी सदैव पुढाकार घेतलेला आहे. ‘एचएएल’ कंपनीला नौदलासाठी या बनावटीची एकूण १६ हेलिकॉप्टर बांधण्याचे काम दिले असून, उर्वरित दहा हेलिकॉप्टरही नौदलात सामील होतील, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. दाबोळी येथील नौदलाच्या हद्दीत आयोजित हा कार्यक्रम झाला.यावेळी भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. हरी. कुमार, भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फिलिपिनोझ पायनमुत्तील, ‘एचएएल’ चे सीएमडी आर. माधवन, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सुविधांचा समावेश...‘एचएएल’ ने बांधलेल्या हेलिकॉप्टरमध्ये वैद्यकीय सुविधा, शोधमोहिमेसाठी लागणारी अत्याधुनिक प्रणालींचा समावेश करण्यात आल्याची माहिती एचएएलचे आर. माधवन यांनी दिली. भारतीय तटरक्षक दलासाठीही हेलिकाॅप्टर बनविले जात आहे. चाचण्या पूर्ण होताच त्यांना देशसेवेत रुजू केले जाईल. यामुळे देशाच्या सागरी सुरक्षेत आणखी वाढ होणार आहे. इतर दहा हेलिकॉप्टर वर्षभरात भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यांचीही गोवा नौदलाच्या तळावर चाचणी केली जाईल. नौदलाला या हेलिकॉप्टरचा चांगला फायदा होईल, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.