पणजी : क्रीडापटूंची कारकीर्द युवा अवस्थेतच संपते तर अन्य लोकांची कारकीर्द ६० वर्षांनंतर संपते. त्यामुळे राज्यस्तरीय नावलौकिक मिळवलेल्या उच्चस्तरीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या क्रीडापटूंना रोजगारासाठी, मुलाखत न घेता सरकारी नोकरी देण्यासाठी आमच्याकडे खास कोटा आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
कुंभारजुवे येथील शारदा सरकारी विद्यालयाच्या क्रीडा मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री गावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार राजेश फळदेसाई, पंच आणि विद्यालयाच्या पालक- शिक्षक संघटनेच्या सदस्यांच्या उपस्थिती होती. जर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना यशस्वी खेळाडू बनवायचे असेल तर आम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण, योग्य सल्ला द्यायला पाहिजे. तसेच त्यांना योग्य सुविधा आणि मैदानही देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही क्रीडा क्षेत्रात अनेक विकासकामे हाती घेत आहोत. विद्यालयांच्या मैदानांची विकासकामे देखील करत आहोत, जेणेकरून सरकारी हायस्कूल येथील कोणत्याही अन्य हायस्कूलबरोबर सहज स्पर्धा करू शकतात. त्याचप्रमाणे क्रीडापटूंना त्यांचे शिक्षण संपल्यानंतर प्रोत्साहन म्हणून सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करत आहोत, असेही गावडे यांनी सांगितले.
मंत्री गावडे यांच्यामुळे क्रीडा खात्यात मोठा बदल पाहायला मिळत आहे. क्रीडा खात्यातील सगळ्या विभागाच्या विकासासाठी विश्रांती न घेता त्यांनी काम केले आहे. गावातील विद्यालयाच्या मैदानाच्या कामाला परवानगी देऊन ते पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मी माझे काम असे करत राहणार आहे, असे आश्वासन यावेळी आमदार राजेश फळदेसाई यांनी दिले आहे.