लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची म्हापसा येथे ३ मे रोजी झालेली जाहीर सभा ३० ते ३५ हजार लोक जमवून यशस्वी करण्यासाठी भाजपचे आमदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. सांकवाळ येथे शनिवारी मोठी गर्दी जमवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी केल्यानंतर लगेच शाह यांच्या सभेच्या जंगी तयारीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे.
म्हापसा येथील आंतरराज्य बसस्थानकावर ३ रोजी दुपारी शाह यांच्या सभेचे आयोजन केले आहे. शाह यांच्या सभेलाही ३० ते ३५ हजार लोक जमविण्याचा संकल्प स्थानिक भाजप नेत्यांनी सोडला असून, पक्षाच्या प्रत्येक आमदार, मंत्र्यावर जबाबदारी दिली आहे. बार्देशमध्ये ही सभा होत असल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार मायकल लोबो, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक व आमदार डिलायला लोबो यांच्यावर विशेष जबाबदारी आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी २४ रोजी शहा यांची सभा म्हापशात होणार होती; परंतु ती अखेरच्या क्षणी पुढे ढकलण्यात आली होती. आता ती ३ मे रोजी होईल.