पणजी : खाणबंदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी विधानसभेचे खास अधिवेशन विनाविलंब बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगवेगळी पत्रे लिहून केली आहे.
या पत्रात कवळेकर म्हणतात की, राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. हजारो लोकांसमोर खास करून डिचोली, सत्तरी, केपे, सांगे, धारबांदोडा, फोंडा तालुक्यातील लोकांच्या समोर संकट उभे ठाकले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारचा महसूल बुडत आहे. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर विधानसभेत व्यापक चर्चा आवश्यक असून केंद्र सरकारला भावना कळवायला हव्यात त्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील ८८ लीजांचे नूतनीकरण रद्दबातल ठरविलेनंतर गेल्या १५ मार्च पासून गोव्यात खाणी बंद आहेत. केंद्र सरकारने वटहुकूम काढावा किंवा एम एम डी आर कायद्यात दुरुस्ती करून खाणींना जीवदान द्यावे, अशी मागणी गेले काही महिने होत असताना केंद्र या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल नसल्याच्या बातम्या दिल्लीहून धडकल्याने खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक तसेच अन्य संबंधित व्यवसायिक यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे. खाणी कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खाण अवलंबितांनी सभापती प्रमोद सावंत यांच्या घरावर धडक देऊन त्यांची भेट घेतली तसेच भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही अवलंबितांचे शिष्टमंडळ भेटलेले आहे. पंधरा ते वीस दिवसात याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन तेंडुलकर यांनी अवलंबितांना दिलेले आहे. परंतु ही केवळ वरवरची आश्वासने आहेत अशी आता खाण अवलंबितांची भावना बनलेली आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षाने आता हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून सरकारने चर्चेसाठी खास अधिवेशन बोलवावे अशी मागणी पक्ष पुढे रेटू लागला आहे.