पणजी : दिपावलीच्या आदल्या रात्री नरकासूर प्रतिमेचे दहन करण्याची परंपरा फक्त गोव्यात सापडते. सध्या गोव्यातील प्रत्येक गावात आणि शहरात नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू आहे. तरुणांचे हात भव्यदिव्य प्रतिमा साकारण्यामध्ये व्यस्त आहे. पर्यटकांनाही याचे आकर्षण वाटते. नरकचतुदर्शीने गोव्यात दिपोत्सवाला आरंभ होतो. नरकासूर म्हणजे मोठा असूर. त्याच्या मोठमोठ्या प्रतिमा तयार करून त्या नरकचतुदर्शीला म्हणजे दिपावलीच्या आदल्या रात्री उशिरा जाळल्या जातात. असुराच्या दहनाने दिपोत्सव सुरू झाला असे गोव्यात मानले जाते. नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर मग पहाटे साडेचार किंवा पाचच्या सुमारास घरोघरी पणत्या पेटवून लावल्या जातात. घरासमोर रंगीबेरंगी आकाश दिवे लावले जातात.
गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे दिपोत्सवाला दारुकामाची आतषबाजी केली जात नाही. नरकासूर प्रतिमा तयार करताना मात्र नरकासुराच्या पोटात फटाके व अन्य दारूगळा भरला जातो. दहनावेळी हा दारुगोळा पेटतो व आवाज होत असल्याने घरी झोपलेल्या लोकांनाही नरकासुर जाळल्याची व दिवाळी सुरू झाल्याची जाणीव होते. गेले काही दिवस गोव्यात नरकासूर प्रतिमा तयार करण्यामध्ये युवक गुंतले असल्याचे दिसून येत आहे. या प्रतिमेसाठी नरकासुराचे लहानमोठे मुखवटे बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांपासून पस्तीशीतील तरुणांपर्यंत शेकडोजण गेले काही दिवस नरकासुर प्रतिमा तयार करत आहेत. गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनाही या कामाचे आकर्षण वाटते.
नरकासुराला दिपावलीच्या आदल्या रात्री गावात फिरवावे आणि मग सीमेवर नेऊन जाळावे अशी प्रथा आहे. प्रत्येक गावात पाच-सहा तरी नरकासुर प्रतिमा तयार केल्या जातात. काही भागात नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धाही होतात.