लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: नार्वे येथील ऐतिहासिक सप्तकोटीश्वर मंदिराला गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच तब्बल सात कोटी रुपये खर्च करून मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा निष्कर्ष खुद्द पुरातत्त्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काढला आहे.
मंत्री फळदेसाई यांनी काल आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह मंदिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंदिराच्या कामाची रीतसर चौकशी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कंत्राटदार कन्सल्टंट, देवस्थानचे पदाधिकारीही उपस्थित होते. सदर मंदिराच्या नूतनीकृत उद्घाटनास मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभलेली होती.
देश-विदेशातही या मंदिराची ख्याती पोहोचलेली असून नूतनीकरणाच्या काही दिवसांतच गळती सुरू झाल्याने याची सखोल चौकशीची मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली आहे.
पुरातत्त्व खात्याने या कामाची देखरेख सार्वजनिक बांधकाम खात्याला दिली होती त्यांनी योग्य जबाबदारी घेतलेली नाही, असे स्पष्ट होत आहे. यात कोणाचा दोष आहे, याची तपशीलवार माहिती घेण्यात येत आहे. - सुभाष फळदेसाई, मंत्री