समीर नाईक, पणजी: सोमवारी राज्यभर होळीच्या निमित्ताने रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपूर्ण राज्य या दरम्यान रंगात न्हाऊन गेले होते. मुले, युवक, महिला, जेष्ठ नागरीक यांनी रंगपंचमीत सहभागी होत, हा उत्सव साजरा केला. सकाळपासून लोकांनी देवाचा आर्शीवाद घेत रंगपंचमीला सुरुवात केली. दुपारपर्यंत राज्यात सर्वत्र केवळ रंगच रंग पसरलेले दिसून येत होते. लोकांमध्ये देखील वेगळा उत्साह यादरम्यान दिसून आला. सामान्य लोकांसाेबत मोठमोठे नेते, उद्योजक, कलाकार, क्रिडापटूंनी देखील रंगपंचमीचा आनंद लुटला.
प्रत्येक शहरात रंगपंचमी निमित्त अशी अनेक सार्वजनिक ठिकाणे तयार करण्यात आली होती, जिथेे एकत्रित येत लोक रंगोत्सवाचा आनंद लुटू शकणार. अनेक ठिकाणी राहीवासी सोसायटी, काही कुटूंबियांनी देखील आपली वेगळी जागा रंगोत्सव खेळण्यासाठी तयार करत याचा आनंद घेतला. गावागावात तर ढोल ताश्यांच्या गजरात मंंदिरांच्या आवारात, वाड्यावाड्यावर घरांच्या आंगणात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यादरम्यान अनेक ठिकाणी खाण्यापिण्याची व्यावस्था देखील करण्यात आली होती.
आझाद मैदानवर रंगाची उधळण
पणजीतील प्रसिध्द आझाद मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगाची उधळण पणजीवासियांकडून करण्यात आली. सकाळी १० वाजल्यापासून येथेे रंगपंचमीला सुरुवात झाली, तेे दुपारी ३ वाजेपर्यंत लोक डीजेच्या गाण्यांवर थिरकत होतेे. या दरम्यान सुमारे हजारभर लाेक आझाद मैदानावर उपस्थित होते. बहुतांश लोक आपल्या कुटूंबियांसोबत, मित्र मैत्रिणींसोबत येथेे उपस्थित होते. पणजीवासियांसोबत, ताळगाव, सांताक्रूझ, मेरशी, बेती तसेच काही पर्यटकांनी देखील येथे उपस्थिती लावत रंगाची उधळण केली.
राजकीय नेतेही रंगले रंगात
राज्यभरातील रंगपंचमी उत्सवात, आमदार, मंत्री, व इतर राजकीय नेत्यांनी उपस्थित राहत अनेकांना रंग लावला. आझाद मैदान येथे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उपस्थिती लावत एकमेकांना रंग लावला. तसेच लोकांसोबतही रंगपंचमी साजरी केली. यावेळी आझाद मैदानावर पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्ळकर, उपमहापौर संजिव नाईक, उत्पल पर्रीकर यांची उपस्थिती होती. इतर ठिकाणी मंत्री गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी आपल्या कार्यकर्ते, हितचिंतकांसोबत रंगोत्सवाचा आनंद घेतला.