लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'राज्यात ऑक्टोबर-डिसेंबर काळात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या विषयावर केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यावहारमंत्री तथा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. राज्याच्या या दोन्ही महत्वाच्या आयोजनासाठी त्यांचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला लाभत आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
'जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला अनुराग ठाकुर उपस्थित होते. त्यांनी वेळात वेळ काढून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आणि इफ्फीच्या आयोजनाबाबत आढावा घेतला. तसेच राज्यात भारतीय ऑल्मिपिक संघटनेचे शिष्टमंडळही दाखल झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे राज्यातील क्रीडा पर्यटनाला वाव मिळणार आहे. राज्यातील खेळाडूंनादेखील आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे,' असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
'नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या इफ्फीच्या आयोजनाबाबत प्राथमिक चर्चा देखील अनुराग ठाकूर यांच्याशी करण्यात आली आहे. १३ मार्च रोजी पुन्हा इफ्फीच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. मंत्री ठाकूर यांनी इफ्फीच्या आयोजनासाठी गेल्यावर्षी खूप सहकार्य केले होते,' असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"