लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण डावलून सरकार आम्हाला गृहीत धरत आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये. २०२४ पूर्वी राजकीय आरक्षण न दिल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एसटी ऑफ गोवाने पत्रकार परिषदेत दिला.
निवडणुकीवर बहिष्कार घालण्याविषयी गावागावात जाऊन एसटी समाजामध्ये जागृती केली जाईल. त्यासाठी बैठकाही घेतल्या जातील. सरकार एसटी समाजाला आपल्या दावणीला बांधू पहात आहे. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. संघटनेचे सरचिटणीस रूपेश वेळीप म्हणाले की, आम्ही मतदारसंघांची पुनर्रचना नव्हे तर सध्याच्या ४० मतदारसंघांमध्ये एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची मागणी करीत आहोत. सरकार मात्र आश्वासनेच देत आहे. एसटी समाजाला अन्य राज्यांमध्ये जर आरक्षण मिळू शकते, तर मग गोव्यात का दिले जात नाही? मागील विधानसभा अधिवेशनात आमदार गणेश गावकर यांनी एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, असा प्रस्ताव सादर केला.
आमदारांना प्रतिस्पर्धी नकोत म्हणून...
संघटनेचे प्रवक्ते गोविंद शिरोडकर म्हणाले, भाजप सरकार एसटी समाजाला गृहीत धरीत आहेत. समाजाचे मंत्री गोविंद गावडे हे केवळ प्रयत्न करीत असल्याचे सांगत आहेत. खरे तर एसटी समाजाच्या आमदारांना कुठलेही प्रतिस्पर्धी नको आहेत. त्यामुळे ते राजकीय आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करीत नाहीत. राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने विश्वासघात केला आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधकांच्या कारवायांना बळी पडू नका : मुख्यमंत्री
एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. समाजबांधवांनी एकी राखताना आपल्या न्याय मागण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत. त्यातून समाजाचा उत्कर्ष होईल. काही नेते समाजाचा राजकीय फायदा घेऊ इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहून खोट्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. बाये-सुर्ला येथे गोमंतक गोड मराठा समाजाच्या ६१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. लक्ष्मीनारायण देवस्थान सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देऊ : तवडकर
आपल्याला जरी अजून राजकीय आरक्षणाचा अधिकार मिळाला नसला तरी तोच जप करत बसण्यापेक्षा सभापती म्हणून वरिष्ठांकडे आपली मागणी पुन्हा मांडण्याची धमक आपल्यामध्ये आहे. राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देऊ,' असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. गोमंतक गौड मराठा समाजाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, समाजातील लोकांचे दोन गट करून लढत बसण्यापेक्षा एकमेकांच्या सुरात सूर मिसळून निर्णय घेतल्यास संघटना खूप चांगले काम करू शकते. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.'