लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटी समाजाला भाजपपासून तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. काणकोणात तर एसटी समाजाने भाजपला भक्कम आधार दिला आहे. काणकोणात किमान १० हजार मतांची आघाडी मिळणार असल्याचे गोव्याचे सभापती तसेच भाजप स्थानिक आमदार रमेश तवडकर यांनी म्हटले आहे.
काणकोण हा राज्यात सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ. ३४,४८४ मतदारांच्या या मतदारसंघात ७८.६९ टक्के मतदान झाले असले तरी २७,२३४ मतदारांनी मतदान केले आहे. तवडकर यांच्या अंदाजानुसार भाजपला या मतदारसंघात १० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळणार आहे, असे ते सांगतात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून एसटी समाजाने भाजपच्या विरोधात मतदान करण्याच्या आवाहनाचा परिणाम झाला का? असे विचारता त्यांनी सांगितले की, कुणी तरी येऊन एसटी समाजाला असे करा आणि तसे करू नका, असे आदेश देणार आणि एसटी समाज ते ऐकून घेणार इतका हा समाज दूधखुळा नाही. खोतिगाव, गावडोंगरी, वैजावाडा, चापोली, लोलये आणि इतर भागात असलेल्या एसटी समाजातील मतदारांनी भाजपला पूर्ण पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
काणकोणात भाजप पक्ष संघटना फार मजबूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचे लोकांचे मजबूत इरादे आणि काणकोणचा होत असलेला विकास लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे लोकांना यावेळी सांगावे लागले नाही. सर्वच पंचायत क्षेत्रात भाजपसाठी प्रचंड मतदान झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांनीही यावेळी भाजपला समर्थन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली होती.