पणजी : दोनापावल येथे कनव्हेन्शन सेंटर बांधण्यासाठी गोवा आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कनवेनश सेंटरसाठी सल्लागार नेमण्यासाठी इच्छाप्रस्ताव ईडीसीने मागितले आहेत.
दोनापावल येथे 2019 साली पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यासाठी तिथे इफ्फीला आवश्यक अशा सर्व साधनसुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात कनव्हेन्शन सेंटर बांधले जाणार आहे. पूर्वी जिथे स्व. राजीव गांधी आयटी हॅबिटेट उभे करण्याचा प्रस्ताव होता, तिथेच कनव्हेन्शन सेंटर आणि एकूण इफ्फी संकुल साकारणार आहे. सुमारे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे कनव्हेन्शन सेंटर उभे केले जाणार आहे. शिवाय हॉटेलप्रमाणो मोठय़ा संख्येने खोल्यांचे बांधकाम तिथे केले जाणार आहे.
दोनापावल येथील जागेत पूर्वी गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) बांधकाम करावे असे वर्षभरापूर्वी ठरले होते. त्यासाठी ईएसजीकडे ती जमीन आयटी महामंडळाने सोपवली होती. मात्र नव्या सरकारने हे काम विशेष यंत्रणोमार्फत व ईडीसीच्या सहभागाने करावे असे ठरविले. मंत्रिमंडळाने त्याविषयीचा निर्णय दीड महिन्यापूर्वी घेतला. त्यामुळे कामाची बहुतांश सुत्रे ईडीसीकडे आली आहेत. पीपीपी तत्त्वावर पूर्ण प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. निविदा जारी करण्याचे काम ईडीसी करणार आहे. आता प्रथम ट्रान्जॅक्शन अॅडव्हायजर ची नियुक्ती केली जाईल. कनव्हेन्शन सेंटरसह आवश्यक सर्व सुविधा दोनापावल येथे निर्माण करण्याच्यादृष्टीने सल्लागार कंपनी ईडीसीला मार्गदर्शन करील, असे सुत्रांनी सांगितले. ट्रान्जॅक्शन अॅडव्हायजर म्हणून नियुक्तीसाठी तांत्रिक व वित्तीय प्रस्ताव सादर करण्यास ईडीसीने इच्छुकांना सांगितले आहे. सरकारी संकेतस्थळावरही याविषयीची जास्त माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. दोनापावल येथे भविष्यात मल्टीप्लेक्सही बांधला जाणार आहे.
दरम्यान, 2018 साली कामाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर 2019 साली इफ्फीपूर्वी दुसरा टप्पा तयार होईल. सध्या इफ्फीनिमित्तचे बहुतांश चित्रपट पणजीत आयनॉक्स मल्टीप्लेक्स व कला अकादमी संकुलात दाखविले जातात. इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होतो. दोनापावल येथे इफ्फी संकुल साकारल्यानंतर सगळे उपक्रम दोनापावल येथेच होतील. गोवा मनोरंजन संस्थेचे कार्यालयही तिथेच असेल.