लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : क्रॉस मोडण्याची मालिका सुरूच असून, शुक्रवारी मडगावच्या कालकोंडा येथे क्रॉसची हानी करण्यात आली. धार्मिक स्थळांच्या विटंबनेची दक्षिण गोव्यातील हल्लीच्या दिवसांतील ही १५वी घटना होय. या भागात मध्यरात्री तीन वाजेपर्यंत पोलीस गस्त होती. त्यानंतर हे कृत्य करण्यात आले. पोलिसांची गस्त झाल्यानंतर शिथिलतेचा लाभ उठवीत समाजकंटक धार्मिक स्थळांची विटंबना करत असल्याचे कालच्या घटनेने पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वी शेळवण व नंतर लोटली येथेही असाच प्रकार घडला होता. कालकोंडा येथे ४ जुलै रोजी श्रीकृष्ण मंदिराबाहेरील नंदीची मूर्ती आणि तुळशी वृंदावनाची विटंबना केली होती. या घटनेच्या दहा दिवसांनंतर पुन्हा येथे क्रॉसची मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे या भागात तणावाचे वातावरण पसरले आहे.मोडण्यात आलेला क्रॉस दिवंगत उपनिरीक्षक सायमन फर्नांडिस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आहे. काल सकाळी या क्रॉसची मोडतोड केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या भागात एकच खळबळ माजली. आमदार दिगंबर कामत यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेबद्दल कामत यांनी खंत व्यक्त केली. आपण या घटनेसंबंधी पोलीस निरीक्षकांशी बोललो असता, मध्यरात्री साडेतीनपर्यंत या भागात पोलीस गस्त होती, अशी माहिती मिळाल्याचे ते म्हणाले. याच भागात काही दिवसांपूर्वी श्रीकृष्ण मंदिराबाहेरील नंदीची मूर्ती आणि तुळशीची विटंबना करण्यात आली होती याची आठवणही त्यांनी या वेळी काढली. दोषींवर कडक कारवाईची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो व अन्य नागरिकांनीही घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा निषेध केला.दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस व उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भादंसंच्या २९५ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञालाही पाचारण करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोटली गावात दोन क्रॉसची मोडतोड करण्यात आली होती. या घटनेला एक दिवस होण्याअगोदरच पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा एकदा क्रॉसच्या मोडतोडीची घटना घडली आहे.दरम्यान, दक्षिण गोव्यात हल्ली धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा आणला आहे. तरीही धार्मिक स्थळांच्या विटंबनेचे प्रकार घडतच असल्याने लोकांत चीड व्यक्त होत आहे.दरम्यान, बाणावली येथील सेंट अँथनी कपेलचा दरवाजा मोडून पडलेल्या स्थितीत आढळला. मात्र, या घटनेत काही काळेबेरे नसल्याचे या कपेलच्या समितीतर्फे सांगण्यात आले.
क्रॉसची मोडतोड सुरूच
By admin | Published: July 15, 2017 2:03 AM