नारायण गावस,पणजी: शिक्षण खात्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा ४ जून पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच दिवशी लाेकसभेच्या निवडणूकांचा निकाल आहे. त्यामुळे शाळा ४ ऐवजी ५ किंवा ६ जूनला सुरु कराव्या, अशी मागणी गाेवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आली आहे.
गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले, ४ जून राेजी लाेकसभेच्या निवडणुकांचा निकाल आहे. राज्यातील अनेक शिक्षक हे निवडणूक ड्यूटीत आहेत. त्यामुळे या दिवशी शाळा सुरु करणे याेग्य नाही. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम हाेणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने एक दिवस पुढे ढकलावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षण मंत्री या नात्याने याचा निर्णय घ्यावा. आम्ही गोवा फॉरवर्डतर्फे त्यांना या विषयी निवेदन देणार आहोत, असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.
दुर्गादास कामत म्हणाले, शाळांचा शैक्षणिक वर्षाचा दिवस हा अगोदर ठरलेला असतो. निवडणुका या काही महिन्यात जाहीर होतात. तरीही नेमके निवडणूकांच्या निकाला दिवशी शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शिक्षकांना या दिवशी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करायला मिळणार नाही. तसेच राज्यभर निकालाचा वातावरण असणार आहे. त्यामुळे जर पहिल्याच दिवसाच्या शैक्षणिक दिवसावर परिणाम झाला तर वर्षभर त्याचा परिणाम होणार, असेही कामत म्हणाले.