पणजी : वन खात्याचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी गेल्या आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी झालेला वाद भोवला आहे. प्रधान मुख्य वनपाल सक्सेना यांना गोव्याच्या सेवेतून मुक्त करून दिल्लीला परत पाठवावे, असे सरकारमध्ये ठरले असून त्याबाबतच्या प्रस्तावावर तत्त्वत: निर्णयही झाला आहे. आदेश कोणत्याही क्षणी जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. सक्सेना आणि वनमंत्री आर्लेकर यांच्यात गेले काही महिने संघर्ष सुरू होता. सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांबाबत प्रधान मुख्य वनपाल नकारात्मक भूमिका घेतात, अशा प्रकारची चर्चा वन खात्यात सुरू होती. तथापि, संघर्षाचा स्फोट गेल्या आठवड्यात झाला. आल्तिनो येथे वन भवनाची पायाभरणी करण्याचा सोहळा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री गेले व वनमंत्री आर्लेकर राहिले. कार्यक्रम संपून परत जाताना आर्लेकर यांनी वन सचिवांच्या उपस्थितीत मुख्य वनपाल सक्सेना यांना काही सूचना केल्या. जे लोक तुम्हाला भेटायला येतात, त्यांना निदान भेटा. दरवेळी स्वत: कामात व्यग्र असल्याचे सांगून लोकांना परत पाठवू नका, असा सल्ला आर्लेकर यांनी दिला. तसेच इतरही काही सूचना केल्या. या वेळी सक्सेना व आर्लेकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली. सार्र्वजनिक ठिकाणी वाद एवढा वाढला की, तुम्ही कुणाशी बोलता याची तरी कल्पना आहे काय, अशी विचारणा वनमंत्र्यांनी सक्सेना यांना केली. दुसऱ्या दिवशी मंत्री आर्लेकर यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व प्रधान मुख्य वनपालांच्या एकूण वागण्याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पार्सेकर यांनीही स्वत:च्या विविध स्रोतांमार्फत माहिती जमवली व प्रधान मुख्य वनपालांना सेवामुक्त करण्याचे ठरविले. त्याबाबतचा प्रस्ताव वन खात्याकडून शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंगळवारी पोहोचला. प्रधान मुख्य वनपाल हे पदही कदाचित रद्द केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. हे पद प्रथम अस्तित्वातही नव्हते. (खास प्रतिनिधी)
प्रधान मुख्य वनपालांना राज्य सरकारचा ‘टाटा’
By admin | Published: December 29, 2016 2:02 AM