पणजी: साऊथ एशिया ट्रॅव्हल्स अँड टुरिझम एक्सचेंज २०२४ (साट्टे २०२४) मध्ये यंदा राज्यातील पर्यटन खाते सहभागी होणार आहे. याठिकाणी गोवा आपल्या अभूतपूर्व पुनर्संचयित पर्यटन उपक्रमांवर प्रकाशझोत टाकेल. पुनर्संचयित पर्यटन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य म्हणून, उद्योगासाठी एक नवीन मानक स्थापित करून, शाश्वत आणि जबाबदार प्रवास पद्धतींमध्ये गोवा आघाडीवर आहे. सदर प्रदर्शन दि. २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ग्रेटर नोएडा, दिल्ली येथे होणार आहे.
साट्टे मध्ये राज्याच्या पर्यटन खात्याचे नेतृत्व खात्याचे उपसंचालक राजेश काळे, पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) महाव्यवस्थापक लक्ष्मीकांत वायंगणकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळचे (विपणन) उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर करणार आहेत. आम्हाला साट्टे २०२४ मध्ये राज्याचे पुनर्संचयित पर्यटन उपक्रम प्रदर्शित करण्यास आनंद होत आहे.
पर्यटनासाठी या परिवर्तनीय दृष्टिकोनाचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य म्हणून, गोवा शाश्वत आणि जबाबदार प्रवासासाठी एक नवीन मानक स्थापित करत आहे. आम्ही उपस्थितांना आमच्या दालनास भेट देण्यासाठी आमंत्रित करतो आणि अधिक संवेदनक्षम, न्याय्य आणि पुनर्संचयित पर्यटन उद्योग बनवण्याच्या आमच्या प्रवासात सामील व्हा, असे आवाहन गोवा पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका यांनी केले आहे.
साट्टे २०२४ मध्ये, गोवा पर्यटनाचे दालन पर्यटन पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन करेल. पर्यटन विभागाचे अधिकारी प्रदर्शनादरम्यान खरेदीदारांशी सक्रियपणे संवाद साधतील, अर्थपूर्ण परस्परसंवाद वाढवतील आणि संभाव्य सहकार्यांचा शोध घेण्यासाठी व्यावसायिक बैठकांची सोय करतील, असेही अंचिपाका यांनी सांगितले.