लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : तीन महिन्यांपूर्वी मडगावच्या दामोदर सालमल्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा अखेर छडा लावण्यात फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी संशयित विकास वसंत नाईक-शिरोडकर याला अटक केली. तो शिरोडा येथील रहिवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी संशयिताने मूर्तीच्या अंगावरील सोनसाखळी, पेंडंट चोरून नेले होते.
पोलिसांनी सांगितले की, ११ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या शहरातील आबाद फारिया मार्गावरील दामोदर साल येथे चोरीची ही घटना घडली होती. याबाबत सुशांत सिनारी यांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञाताने देवालयात शिरून मूर्तीच्या अंगावरील सोनसाखळी व सोन्याचे पेंडंट चोरून नेल्याचे नमूद केले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख रुपये इतकी आहे. सिनारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंसंच्या कलम ४५४ व ३८० अन्वये या प्रकरणाची नोंद केली होती
अटक केलेल्या संशयित विकासचा अन्य ठिकाणच्या चोरी प्रकरणांतही सहभाग असावा, असा पोलिसांना कयास आहे. पोलिस त्याची सध्या कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या अलंकाराबाबतही माहिती जाणून घेत आहेत. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमिन नाईक तपास करीत आहेत.
दरम्यान, संशयित विकासला अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले अलंकारही जप्त करण्यात केले आहेत. दरम्यान, हे मंदिर ज्या नायक शंखवाळकर यांच्या घरात आहे, त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही चोरी आताची नसून ती घटना तीन महिन्यांपूर्वीच झाली होती, असे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा का? नोंद केला नाही याची आम्हाला काहीही कल्पना नाही, असे सांगण्यात आले
पोलिस त्याच्या मागावर होते. तो सतर्क होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती, त्यामुळे पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा गुन्हा नोंदविला नव्हता. मात्र, तक्रारीची संपूर्ण दखल घेउन तपासकाम केले होते, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनीच लपवली चोरी?
मडगावच्या दामोदर सालातील चोरी प्रत्यक्षात झाली होती १० फेब्रुवारीला मात्र पोलिसांनी ती माहिती लपवून ठेवली होती. पोलिसांनी हे का केले याबाबत माहिती समोर आलेली नाही. याबाबत दक्षिण गोव्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्याबाबत प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, पोलिस अनेक गुन्हे लपवून ठेवत असतात हे यापूर्वीही उघड झालेले आहे.