पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: गांधी जयंतीच्या निमित्ताने असलेल्या ‘ड्राय डे’ (दारू विक्रीबंदी) दिवशी दक्षिण गोव्यातील बायणा, वास्को येथील एका किराणा दुकानात बेकायदेशीररित्या विकण्यासाठी ठेवलेला ६६ हजाराचा दारू (मद्य) वास्को अबकारी खात्याने छापा टाकून जप्त केला. वास्को अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२) संध्याकाळी दोन ठीकाणी छापे मारून ‘ड्राय डे’ दिवशी विकण्यासाठी ठेवलेला एकूण ९२ हजाराचा दारू जप्त केला.
२ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतात ‘ड्राय डे’ (मद्य विक्री बंदी) पाळला जातो. ‘ड्राय डे’ असल्याने सोमवारी वास्को अबकारी खात्याचे निरीक्षक मुकुंद गावस आणि इतर अधिकारी मुरगाव तालुक्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, बार इत्यादी दारू विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद आहेत याची खात्री करून घेण्यासाठी मुरगाव तालुक्यात पाहणी करत होते. पाहणी करताना ते बायणा, वास्को परिसरात पोचले असता तेथील एका कीराणा दुकानाच्या बाहेर त्यांना लोकांची गर्दी दिसून आली. त्या कीराणा दुकानाबाहेरील लोकांची गर्दी पाहून अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना संशय निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी तेथे थांबून त्या कीराणा दुकानात तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणीवेळी कीराणा दुकानात त्यांना दारू आढळून आली नाही, मात्र नंतर त्यांनी कीराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात दारू ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. तो दारू कोणी आणि कशासाठी आणून ठेवला आहे त्याबाबत कीराणा दुकानात असलेल्या संबंधित व्यक्तीला विचारले असता त्याच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही.
‘ड्राय डे’ दिवशी बेकायदेशीर रित्या तो दारू विकण्यासाठी आणून ठेवल्याचे तपासणीत समजल्यानंतर वास्को अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून तो दारू जप्त केला. त्या कीराणा दुकानातून विविध प्रकारच्या जप्त केलेल्या दूरूची कींमत ६६ हजार असल्याची माहीती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. ‘ड्राय डे’ दिवशी बेकायदेशीर रित्या मद्य विकण्यासाठी आणून ठेवलेल्या प्रकरणात अबकारी खात्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केल्याची माहीती निरीक्षक मुकुंद गावस यांनी दिली.
दरम्यान अबकारी खात्याकडून तपासणी होत असताना बायणा येथील एका खुल्या जागेत त्यांना लोकांची गर्दी दिसून आली. संशयावरून अधिकाऱ्यांनी तेथे तपासणी करायला सुरवात केली. त्यावेळी तेथील एका झुडपी भागात विविध प्रकारच्या दारूच्या काही खाली आणि काही दारूच्या भरलेल्या पेट्या (बॉक्स) असल्याचे आढळून आले. दारूच्या त्या पेट्यासमोर कोणीही नसल्याने बेकायदेशीर रित्या दारू विकणाऱ्या त्या व्यक्तीने अबकारी खात्याचे अधिकारी पोचण्यापूर्वी तेथून पोबारा काढल्याचे उघड झाले. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेथे असलेल्या दारूच्या पेट्या जप्त केल्या असून त्यांची कींमत २६ हजार रुपये असल्याची माहीती अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. ‘ड्राय डे’ दिवशी वास्को अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन ठीकाणी छापे टाकून बेकायदेशीररित्या विकण्यासाठी ठेवलेली एकूण ९२ हजाराची दारू (मद्य) जप्त केली.