पणजी : सनबर्नचा महोत्सव हा अंमली पदार्थाच्या वापराशिवाय होऊच शकत नाही. ड्रग्ज अगदी सहज उपलब्ध होत आहेत. सरकारने गोव्यात सनबर्न आयोजित करणे बंदच करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.येथे पत्रकारांशी बोलताना आलेमाव म्हणाले, की ड्रग्ज व्यवसाय कसा चालतो, त्याविषयी आपण यापुढील विधानसभा अधिवेशनातही बोलणार आहे. पोलिसही गुंतलेले आहेत. जर ड्रग्जचे व्यवहार बंद झाले तर मग सनबर्नही बंद होईल. सनबर्न हा ड्रग्जमुळेच होतो. अशा प्रकारचे सोहळे गोव्याला नकोत. युवा पिढी बरबाद होत आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडेही सनबर्न बंदीची मागणी करीन. पोलिसही सामिल असल्याने सनबर्नच्या परिसरात ड्रग्ज उपलब्ध होतात. ड्रग्जच्या गोळ्य़ा अलिकडे कुठेही सहज मिळतात. राज्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्ज पोहचले आहेत, असे आलेमाव म्हणाले.दरम्यान, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की सनबर्न ही जरी गोव्याची संस्कृती नसली तरी, पर्यटन व्यवसायासाठी सनबर्नसारख्या सोहळ्य़ांचीही गरज असते. त्यामुळे सरकारला समतोल साधावा लागतो. सनबर्न गोव्याची संस्कृती आहे, असे मी म्हणणार नाही. गोव्याची संस्कृती व सनबर्न यांची तुलनाच होऊ शकत नाही. गोव्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपले कला व संस्कृती खाते खूप उपक्रम राबवते. कला अकादमी पाश्चीमात्त्य संगीताचेही वर्ग आयोजित करते. सनबर्नमध्ये पाश्चिमात्य संगीत व संस्कृती आहे पण त्याचीही गरज पर्यटनाला आहे. सनबर्नमध्ये जाण्याची किंवा तिथे नृत्य करण्याची सक्ती कुणीच कुणावर करत नाही. प्रत्येकाने स्वत: काय करावे ते ठरवायला हवे.
Sunburn 2019 : सनबर्न महोत्सव बंद करा, चर्चिल आलेमाव यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 6:56 PM