लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आग्वाद किल्ल्यावरील दारू विक्रीबाबत आम्ही निषेध केला आहे. जोपर्यंत दारूविक्री बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आगामी काळात किल्ल्यावरील दारू विक्री बंद झाली नाही, तर सत्याग्रह केला जाईल' असा इशारा गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेने प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
दरम्यान, स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. स्वातंत्र्य सैनिकांच्या इतर प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत, गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेने म्हटले आहे की, पुढील वर्षीपासून गोवा मुक्ती चळवळीचा इतिहास शाळेत समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. संघटनेच्या अध्यक्षांनी गोवा क्रांतिदिनी आझाद मैदानावर जे विधान केले, त्याचा अर्थ चुकीचा लावला गेला असे संघटनेने म्हटले आहे.
याबाबत संघटनेने सांगितले की, अध्यक्षांचे म्हणणे हे सरकारच्या कामकाजावर आरोप करणे, असे नव्हते. याउलट सध्या प्रशासन आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, गृह, वित्त, लेखा असे कोणतेही खाते असो वा इतर ठिकाणी आमचा खूप आदर केला जातो. आमची कामे तत्परतेने केली जातात,' असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
आता केंद्र सरकारवर आरोप
'राज्य सरकार पेन्शनबाबत तत्पर आहे. मात्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्यसैनिक विभागाकडून निवृत्ती वेतन रोखून धरले जात आहे, असे स्वातंत्र्यसैनिक संघटनेने म्हटले आहे. ६ जून २०२२ रोजी स्वातंत्र्य सैनिकांच्या कल्याण समितीमध्ये आमच्या संघटनेने हा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी तत्परतेने आयएएस अधिकारी संजीव गडकर यांची नियुक्ती करून त्यांना हा विषय हाताळण्यास दिला. पण त्यांची अचानक काश्मीरमध्ये बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांची नियुक्ती केली. पण, दुर्देवाने जी २० परिषदेची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवल्याने हा विषय रखडला असे संघटनेने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे संघटनेने सांगितले.