किशोर कुबल, पणजी: रायबंदर मार्केट प्रकल्पाच्या बाबतीत आराखड्याचे उल्लंघन केल्याबद्दल उत्तर गोवा पीडीएने इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावून काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून काम चालू असल्याचे आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. हे काम स्मार्ट सिटी अंतर्गत चालू आहे.
उत्तर गोवा पीडीएने इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नोटिसीत यांना जारी केलेल्या नोटिसीत असे म्हटले आहे की, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी केलेल्या संयुक्त जागेच्या तपासणीत मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून बांधकाम केले जात असल्याचे आढळून आले आहे. ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत काम तात्काळ थांबवावे. कारणे दाखवा नोटीसीत अशीही विचारणा करण्यात आली आहे की, नगर, नियोजन कायदा, १९८४ च्या कलम ५२ अन्वये कारवाई का केली जाऊ नये? १७ नोव्हेंबर रोजी बजावलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी या विषयावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
चोडणकर म्हणाले की, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने स्पष्ट उल्लंघन केल्याबद्दल काम थांबवण्याची नोटीस जारी झालेली आहे. सार्वजनिक निधीच्या अपव्ययासाठी आता कोणाला जबाबदार धरायचे? याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख म्हणून द्यावे. तसेच या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करावी.