लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईबाबत जनजागृतीसाठी आयोजित पदयात्रा रोखणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते मनोज परब यांनी दिली आहे. पदयात्रा अडविणाऱ्या स्थानिक पंच, सरपंचांवर त्यांनी टीका केली.
मनोज परब म्हणाले की, 'आमदार दिव्या राणे यांनी तसेच स्थानिक पंचायत मंडळांनी सत्तरीमध्ये म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी बाहेरच्यांची गरज नसल्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य निषेधार्ह आहे. सत्तरीमध्ये येण्यास कोणीच कुणाला अडवू शकत नाही. कोणीही अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकतो. जे आज सत्तरीच्या विकासाची भाषा करतात, त्यांनी आमच्याबरोबर येऊन सत्तरी बघावी. आम्ही त्यांना खरा विकास दाखवून देऊ. कुठे कसा विकास झाला आहे, ते आम्ही दाखवून देऊ.'
परब म्हणाले की, 'आज खरेतर सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी म्हादईबाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रा, जनसभा आयोजित करायला पाहिजे होत्या. तसे न करता जे यासाठी आवाज उठवत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तरीमध्ये आमचे दहा हजार मतदार आहेत. त्यांच्यासह इतरांना जागे करण्यासाठी ही जनजागृती आहे. म्हादई नदी वाचली पाहिजे ही भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी म्हादईचा जास्तीत जास्त परिणाम होणाऱ्या गावांतील लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मात्र, आम्हाला कोणीच अडवू शकत नाही.
दरम्यान, आरजीचे वकील धवल झावेरी यांच्याशी संपर्क साधला असता पदयात्रा ज्या कारणास्तव रोखली आहे, ते आक्षेप चुकीचे आहेत, असे सांगितले. आरजी पक्षाच्यावतीने सत्तरी तालुक्यातील ठाणे ते उसगाव अशी सुमारे १०० किलोमीटरची ही पदयात्रा काढण्यात येणार होती. सोमवारी पदयात्रेस सुरुवात झाल्यावर म्हाऊस-सत्तरी पंचायतीने त्यास आक्षेप घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"