मडगाव - क्यार वादळाचा दक्षिण गोव्याला बराच मोठा फटका बसला. शुक्रवारी रात्री समुद्राचे पाण्याची पातळी वाढून जवळच्या शॅक्स आणि रेस्टॉरंट्समध्ये ते घुसल्याने कित्येक व्यावसायिकांची तारांबळ उडाली. या वादळाचा मच्छिमारांनाही फटका बसला. बेतूल येथे तडीवर आणून ठेवलेल्या बारा होड्या वाहून गेल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, असोळणा या भागात समुद्राच्या वाढलेल्या पाण्याने व्यावसायिकांची तारांबळ उडून गेली. असोळणा येथे खाडीच्या काठाला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पाणी घुसल्याने व्यावसायिकांचा एकच आकांत उडाला.बाणावलीतही समुद्राचे पाणी वाढल्याने भरती रेषेपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या शॅकमध्येही पाणी घुसले. या पाण्याचा जोर बराच मोठा होता अशी माहिती बाणावलीतील शॅकमालक रमेश वरक यांनी दिली. मात्र शनिवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्याने हे पाणी बरेच ओसरले होते. शुक्रवारी खवळलेला समुद्र शनिवारीही तसाच होता. शुक्रवारी रात्री पाण्याची पातळी वाढून समुद्राचे पाणी काठावरील रेस्टॉरंटात घुसले होते. मात्र शनिवारी हे पाणी ओसरु लागल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.दर्या खवळलेला असल्यामुळे तिसऱ्या दिवशीही समुद्रात मासेमारीसाठी होड्या सोडल्या गेल्या नाहीत. शुक्रवारी बहुतेक होड्या काठावर आणून ठेवल्या होत्या. मात्र बेतूल येथे सुमारे 12 होडय़ा पाण्यात वाहून गेल्या, अशी माहिती प्राप्त झाली आहे.यंदा शॅकवाटप उशीरा झाल्याने किनारपट्टीवर अजुनही शॅक्सची बांधणी केलेली नाही. यामुळे पर्यटन व्यावसायिक चिंतेत होते. मात्र शुक्रवारी समुद्राचे पाणी वाढल्यानंतर शॅक्स उभारले नाहीत तेच चांगले झाले,अशी प्रतिक्रिया या व्यावसायिकांकडून ऐकू आल्या. अन्यथा आमचे फार मोठे नुकसान झाले असते अशी प्रतिक्रिया शॅक्स मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कादरेज यांनी व्यक्त केली.बेपत्ता खलाशाचा अजून पत्ता नाहीगुरुवारी मोबोर—बेतूल येथील समुद्रात मच्छीमारी होडी बुडाल्याने बेपत्ता झालेल्या खलाशाचा शनिवारीही पत्ता लागला नव्हता. खवळलेल्या समुद्रात तो दूरवर वाहून गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात असून तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न शनिवारीही चालू होता. बेतूल किनारपट्टी पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, शनिवारीही संपूर्ण दर्या खवळलेला असल्याने शोधकार्यात व्यत्यय येत होता. सदर घटनेसंदर्भात सर्व किनारपट्ट्यांना सतर्क केले असल्यांचे त्यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यात शॅक्समध्ये पाणी घुसल्याने पर्यटन व्यावसायिकांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 5:41 PM