लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारमधील सर्व मंत्री तसेच भाजपचे सर्व आमदार मगो पक्षाचे दोन्ही आमदार आणि तीन अपक्ष आमदार यांची मिळून एकत्र बैठक आज प्रथमच पणजीत होणार आहे. भाजपचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे ही बैठक घेण्यासाठी आज, बुधवारी सकाळीच गोव्यात दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होईल.
सावंत सरकार अधिकारावर येऊन आता दीड वर्षाचा कालावधी झाला. सत्ताधारी आघाडीची एकत्र बैठक कधीच झाली नव्हती. आज सकाळी साडेदहा वाजता सांतीनेज पणजी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोवा, असे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मतांनी जिंकायला हवेत, असे लक्ष्य राजीव चंद्रशेखर यांना भाजपच्या श्रेष्ठींनी ठरवून दिलेले आहे. त्यामुळे चंद्रशेखर यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक बोलावली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघावर यावेळी भाजपचे विशेष लक्ष आहे.
ते घेतील कानोसा
आजच्या बैठकीत राजीव चंद्रशेखर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोघेही मार्गदर्शन करतील. तथापि, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचेही मुख्य भाषण होणार आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिकणे भाजपला शक्य आहे काय? याचा कानोसा चंद्रशेखर हे आमदारांकडून व मंत्र्यांकडून घेणार आहेत. गेल्यावेळी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सहकार्य केले नव्हते व त्यामुळे भाजपला दक्षिण गोवा मतदारसंघ गमवावा लागला होता. त्यावेळी बाबू कवळेकर हे देखील कॉंग्रेसमध्ये होते. यावेळी ढवळीकर, कवळेकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर आदींच्या भूमिका महत्त्वाच्या असतील.
सुदिन ढवळीकर व जीतही बैठकीस
आजच्या बैठकीत भाजपसह मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आलेक्स रेजिनाल्ड आंतोन वास हे सहभागी होतील. मंत्री बाबूश मोन्सेरात हे गोव्याबाहेर असल्याने बैठकीला पोहचणार नाहीत, असे भाजपला वाटते.
तिकिटाबाबतही चाचपणी
राजीव चंद्रशेखर हे आज पूर्ण दिवस गोव्यात असतील. रात्री ते दिल्लीला परततील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ रोजी गोव्यात दाखल होतील. राजीव चंद्रशेखर हे त्यावेळी गोव्यात नसतील. दक्षिण गोवा मतदारसंघात यावेळी भाजपने कुणाला तिकीट द्यावे याचा कानोसा चंद्रशेखर घेणार आहेत. काही इच्छुक उमेदवार चंद्रशेखर यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. उत्तर गोवा मतदारसंघातून लढण्यासाठीही भाजपमधील दोघे नेते इच्छुक आहेत. तेही स्वतंत्रपणे चंद्रशेखर यांना भेटतील. अशी माहिती मिळाली.