पणजी: स्वत:च्या ७ वर्षे वयाच्या भाच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या उत्तर गोव्यातील गुरूदास शिरोडकर याला पणजी बालन्यायालयाने तब्बल ३५ वर्षांची शिक्षा सुनावली. पैकी दहा दहा वर्षांच्या दोन शिक्षा एकाचवेळी भोगण्याची मुभा असल्यामुळे १० वर्षे सक्तमजुरी त्याला करावी लागणार आहे. त्याच बरोबर ३.५ लाख रुपये दंडही ठोठावला आहे. २०१३ साली आईचे छत्र हरवल्यामुळे मामाच्या घरी रहायला गेलेल्या या मुलावर शिरोडकर याने खूप वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी १० वर्षे बाल कायद्याखाली १० वर्षे आणि बाल सुरक्षा कायद्यांतर्गत ५ वर्षे मिळून शिक्षेची ३५ वर्षे होतात. दहा वर्षांच्या दोन शिक्षा एकाच वेळी तो भोगणार असल्यामुळे प्रत्यक्ष सक्तमजुरीची वर्षे १० होत आहेत. आईच्या निधनानंतर मुलाला जुने पोलीस स्थानक क्षेत्रात असलेल्या मामाच्या घरी येथे ठेवण्यात आले होते. तिथे त्याची व्यवस्था सारखी होत नाही असे आढळून आल्यानंतर त्याला एका समाज सेवी संस्थेच्या मदतीने एका निवारा घरात ठेवण्यात आले.निवाराघरात त्याची व्यवस्था चांगली होत होती एवढेच नव्हे तर तो तिथे चांगला रमलाही. निवाराघरात राहणा-या मुलांची नियमितपणे बाल कल्याण समितीच्या पदाधिका-यांकडून चौकशी केली जाते. अशाच चौकशीदरम्यान या मुलाने मामाच्या घरी राहत अस ताना मामाने कोणते अत्याचार केले होते ते सांगितले. त्यानंतर एका बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने या प्रकरणात जुने गोवा पोलीस स्थानकात गोवा बाल कायदा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला होता. बाल संरक्षण कायद्याची कलमेही त्याला लावण्यात आली. गुन्हा नोंदविण्यात आल्यावर शिरोडकरला पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात तपास पूर्ण करून पणजी बाल न्यायालयात जुने गोवा पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जुने गोवा पोलिसांकडून या प्रकरणात बाल न्यायालयात सज्जड पुरावे सादर केले गेले. वैद्यकीय अहवालही पोलीसांनी सादर केले. अत्यंत महत्त्वपूर्ण साक्षीही नोंदविल्या गेल्या. स्वत: पीडित मुलाची साक्ष यात महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी घोषित केल्यानंतर मंगळवारी सजा सुनावली.
भाच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या मामाला सक्तमजुरी, बाल न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 9:34 PM