पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या येत्या रविवार १६ रोजी गोव्यात फर्मागुडी येथे होणार असलेल्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरु आहे. आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फर्मागुडी येथे जीईसी मैदानाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते. शहा यांच्या सभेला २५ हजार लोक जमवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा गोवा दौरा आहे. फर्मागुडी येथील इंजिनिरिंग कॉलेजच्या मैदानावर रविवारी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकीयांना संबोधित करणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकांचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी राष्ट्रीय नेत्यांनी देशातील राज्याचे दौरे सुरू केले आहेत. भाजपाचे संघटन निवडणुकीच्या कामाला लागले असून सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
शाह यांच्या या दैऱ्याकडे राजकीय विश्लेषकांसह नागरीकांचे लक्ष लागले असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला गोमंतकीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.