पणजी: एकदा मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूमध्ये ठेऊन दरवाचा बंद केला की तो नंतर मतमोजणीच्या दिवशीच उघडला जातो, परंतु उत्तर गोव्यातील स्ट्रॉंगरूम निवडणूक अधिका-यांना शनिवारी खोलावी लागली. स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही सर्व्हेलन्समध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे तो खोलण्यात आला.
दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतदान यंत्रे ठेवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात मिळून ४३ स्ट्रॉंगरूम बनविण्यात आले आहेत. उत्तर गोव्यात एकूण २२ स्ट्रॉंगरूम आहेत. त्यापैकी मांद्रे मतदारसंघातील स्ट्रॉंगरूमला देण्यात आलेले सीसीटीव्ही कॅम-यांचे सर्व्हेलन्स बिघडल्याचे सकाळी निवडणूक कार्यालयाच्या तांत्रिक विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे स्ट्रॉंगरूम खोलून ते दुरूस्त करणे आवश्यक होते. मांद्रे मतदारसंघातील सर्व उमेदवारांचे प्रतिनिधींना बोलवून घेऊन व जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूमचा दरवाचा खोलण्यात आला. तसेच मांद्रे मतदारसंघासाठीच्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमे-यात झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला व नंतर स्ट्रॉंगरूम पुन्हा बंद करण्यात आला.
एकदा मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूममध्ये ठेवून तो बंद केल्यानंतर निकालाच्यापूर्वी तो खोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचे कारणही वेगळे आहे. यापवूर्वी एकच स्ट्रॉंगरूम केला जात होता व त्यात सर्व मतदारसंघातील मतदानयंत्रे ठेवण्यात येत होती. आता प्रत्येक मतदारसंघासाठी एक मतदानयंत्र मिळून ४० स्ट्रॉंग रूम आणि शिवाय तीन विधानसभेचे मिळून ४३ स्ट्रॉंगरूम करण्यात आले होते व प्रत्येक स्ट्रॉंगरूमसाठी सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले होते. त्यामुळे एखाद्या स्ट्रॉंगरूमचे सीटीटीव्ही कॅमरे जरी बिघडले तरी पुन्हा स्ट्रॉंगरूम खोलावा लागणार आहे. कारण स्ट्रॉंगरूमना इलेट्रॅानिक सुरक्षा ही महत्त्वाची आहे.
स्ट्रॉंगरूमला तिहेरी सुरक्षा कवच देण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्ट्रॉंंगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. तसेच स्ट्रॉंगरूमच्याबाहेर निमलष्करी दळाच्या जवानांचे सुरक्षाकडे आहे. आल्तिनो येथील ज्या सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालाच्या इमारतीत हा स्ट्रॉंग रूम बनविण्यात आला आहे. त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर गोवा पोलिसांची सुरक्षा आहे. म्हणजेच एखाद्याने ईव्हीएम सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केलाच तरी त्याला अशा तीन सुरक्षाफळी भेदाव्या लागतील जी गोष्ट केवळ अशक्य आहे असा दावा निवडणूक अधिका-याने केला आहे.