- नारायण गावस
पणजी: काही विद्यार्थी संघटना गोवा विद्यापीठात राजकारण आणून विद्यापीठाचे नाव खराब करु पाहत आहेत. आमचा याला पूर्ण विरोध असून सत्य जाणून घेतल्याशिवाय गाेवा विद्यापीठाचे नाव खराब करु नये, असे आवाहन गोवा विद्यापीठ कॅम्पस विद्यार्थी संस्थेने केले आहे. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष अमय गावस, सचिव सुदेश खांडेपारकर, विशाल नाईक व इतर सदस्य उपस्थित हाेते.
सचिव सुदेश खांडेपारकर म्हणाले, गेल्या आठवड्यात एका विद्यार्थी संघटनेने पत्रकार परिषद घेऊन गोवा विद्यापीठाच्या कॅन्टींगमधील जेवणात किडे सापडले असा आरोप करुन विद्यापीठाचे नाव बदनाम केले आहे. हे लाेक कधी गाेवा विद्यापीठात खायला येत नाही. आणि हा प्रकार विद्यापीठाच्या कॅन्टीगचा नसून हॉस्टेल मेसचा आहे. हॉस्टेल मेसमध्ये चांगले जेवण मिळत नसल्याचे आम्ही गोवा विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना आमची तक्रार दिली आहे. आता यासाठी नवीन कंत्राटदाराला हे कंत्राट दिले जाणार आहे. आम्ही अचानक हे जेवणाचे कंत्राट बंद करु शकत नव्हतो अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असता.
विशाल नाईक म्हणाले, काही विद्यार्थी संघटना वेळोवेळी फक्त पत्रकार परिषद घेऊन राजकारण करत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांचे विषय हाताळण्यास सक्षम आहाेत. आम्हाला आमचे विद्यापीठ प्रथम आहे. देशपातळीवर विद्यार्थ्यांचे नाव गाजले पाहीजे. विद्यापीठासाठी चांगले काम केले पाहीजे फक्त आरोप करुन काहीचा हाेणार नाही.