सुभाष शिरोडकर जमीन घोटाळा: 13 मे रोजी लोकायुक्तांसमोर होणार पुढील सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:43 PM2019-03-19T12:43:24+5:302019-03-19T12:50:18+5:30
माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्धच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे.
पणजी - माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्धच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे.
16 ऑक्टोबर रोजी शिरोडकर यांनी काँग्रेस आमदारकीचा या आर्थिक फायद्यासाठीच राजीनामा दिला आणि भाजपाप्रवेश केला, असा आरोप आयरिश यांनी तक्रारीत केला आहे. शिरोडकर यांनी काँग्रेसी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाप्रवेश केला आणि आता ते शिरोडा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवित आहेत. या कथित घोटाळा प्रकरणात शिरोडकर आणि सरकार यांच्यातील संगनमत दाखवून देणारे आणखी काही दस्तऐवज याचिकादार आयरिश रॉड्रिग्स यांनी मंगळवारी (19 मार्च) लोकायुक्तांना सादर केले आहेत.
70 कोटी रुपयांचे हे कथित जमीन घोटाळा प्रकरण आज सकाळी लोकायुक्तांसमोर कामकाजात आले. शिरोडकर व त्यांच्या नऊ कर्मचाऱ्यांनी या जमिनीवर शिरोडा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये कर्ज घेऊन ही जमीन गहाण ठेवलेली असतानाही उद्योग खात्याने ती घेतलेली आहे, असा आयरिश यांचा दावा आहे. अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपा प्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची 70 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केलेली आहे, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. हा मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. आमदारकी तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेश केलेले शिरोडकर यांना या व्यवहारातून सरकारने कसा फायदा करुन दिला याची माहिती लोकायुक्तांसमोर त्यांनी ठेवली आहे. शिरोडा येथील लागवडीखालील तब्बल 1 लाख 83 हजार 524 चौरस मीटर जमीन सरकारने 70 कोटी रुपयांना विकत घेतली बाजारदरापेक्षाही जास्त किंमत शिरोडकर यांना या जमिनीसाठी सरकारने दिली, असा आरोप आहे.
आयरिश यांनी लोकायुक्तांच्या असेही निदर्शनास आणून दिलेले आहे की, या जमीन घोटाळ्याबाबत मुख्य सचिवांकडेही गेल्या 29 मे रोजी त्यांनी तक्रार केलेली आहे आणि सरकारने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.