लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भालचंद्र गावकर लेखणीद्वारे नेहमी बोलत आले आहेत. त्यांच्या लेखणीतून सामाजिक भावना व्यक्त होत असते, असे उद्गार जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले. गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
सांगे येथील संजना पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. बेतोडा फोंडा येथील केशव सेवा साधना सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, खास अतिथी म्हणून गोवा विद्यापीठ कोकणी विभागाचे डॉ. हनुमंत चोपडेकर, संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. हनुमंत चोपडेकर म्हणाले, 'पनवत' ही साहित्यकृती कल्पना व वास्तव यांच्या मिश्रणातून आपल्या शब्द सामर्थ्याने सामाजिक जाणिवांनी भरलेली असल्याचे स्पष्ट होते. मुख्य पात्रांबरोबरच इतर पात्रांनाही तेवढेच महत्त्व दिल्याने कारणाने सगळी पात्रे मुख्य कथानकाचा भाग बनून जातात. वसंत सावंत यांनी आपल्या भाषणात प्रा. भालचंद्र गावकर यांच्याकडून साहित्यक्षेत्रात अधिक अपेक्षा असल्याचे सांगून ते त्या पुऱ्या करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा. भालचंद्र गावकर यांचे यापूर्वी तीन कथासंग्रह, चार कवितासंग्रह एक आत्मचरित्रपर पुस्तक तसेच कोकणी भाषा विज्ञान आणि साहित्य : एक भासाभास ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वागत दिनेश मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर सालेलकर यांनी, तर आकाश गावकर यांनी आभार मानले.