लोकमत न्यूज नेटर्वक डिचोली/पणजी : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आरएसएसचे माजी गोवा संघचालक सुभाष वेलिंगकर हे डिचोली पोलिस स्थानकात हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर पोलिस स्थानक परिसरात वेलिंगकर यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. मात्र वेलिंगकर मागच्या दरवाजाने स्थानकात दाखल झाले. त्यानंतर अर्धा तास त्यांची जबानी नोंद करून घेतल्यानंतर ते निघून गेले.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आरएसएसचे माजी गोवा संघचालक सुभाष वेलिंगकर यांना गुरुवारी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून दिलासा मिळाला होता. वेलिंगकर यांनी पोलिस तपासात सहकार्य केल्यास त्यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश हायकोर्टाने दिला आहे.
मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत, असे वेलिंगकर यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, वेलिंगकर यांच्याविरुद्ध डिचोली पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांनी उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु तो अर्ज फेटाळण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका बुधवारी वेलिंगकर यांनी सत्र न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणात त्यांचे वकील सरेश लोटलीकर यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी निवाडा दिला.
न्यायालयात काय घडले....
वेलिंगकर यांची आव्हान याचिका गुरुवारी सकाळी १०.४० वाजता सुनावणीस आली. ज्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ च्या उल्लंघनाचा उल्लेख करून सत्र न्यायालयाने वेलिंगकर यांना जामीन नाकारला होता नेमक्या त्याच कलमावर भर देऊन वेलिंगकर यांचे वकील अॅड. सरेश लोटलीकर यांनी युक्तिवाद केले. या कलमा अंतर्गत पोलिस अधिकारी जेव्हा चौकशीसाठी संशयिताला बोलावतो तेव्हा त्याला अटक करण्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी केला. न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांनाही तोच प्रश्न विचारताना वेलिंगकर यांच्या अटकेची गरज काय, असे विचारले. तेव्हा सरकारी वकिलाकडून त्यांना अटकेसाठी बोलावले नव्हते तर तपासासाठी बोलावले होते. परंतु ते सहकार्य करीत नाहीत, असे सांगितले. त्यावर अॅड. लोटलीकर यांनी सुभाष वेलिंगकर हे तपासासाठी सहकार्य करतील. असे सांगितले. परंतु त्यांना अटक न करण्याचा अंतरिम दिलासा दिला जावा, अशी मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी वेलिंगकर यांना गुरुवारी ५ वाजता डिचोली पोलिस स्थानकात उपस्थित राहण्यास सांगितले, जे लोटलीकर यांनी मान्य केले. तसेच तपासासाठी सहकार्य करीत असेल तर त्यांना अटक करू नये, असेही न्यायाधीशांनी सांगितले.
पाच वाजेपर्यंत हजर राहणे होते गरजेचे
वेलिंगकर यांना डिचोली पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावे लागेल. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहावे लागणार होते. मात्र ४ वाजताच ते पोलिस स्थानकात पोहोचले. वेलिंगकर तपास कामात सहकार्य करीत असतील तर त्यांना अटक करू नये, असे निर्देश न्याायधीशांनी पोलिसांना दिल होते. त्यामुळे वेलिंगकर यांना हा मोठा दिलासा मिळाला होता. वेलिंगकर यांना अंतरिम दिलासा मिळाल्यामुळे या प्रकरणातील हवा निघून गेल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुढील सुनावणी १५ रोजी
गुरुवारी ५ वाजता सुभाष वेलिंगकर डिचोली पोलीस स्थानकात चौकशीला हजर राहून परतल्यामुळे आता त्यांची अटक टळली आहे. परंतु, या चौकशीचा अहवाल पोलिसांना न्यायालयाला सादर करावा लागणार आहे. पुढील सुनावणी १५ रोजी होणार आहे.