पणजी - गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या कारकिर्दीचे सात महिने या आठवड्यात पूर्ण झाले आहेत. गोवा प्रशासनाला आकार देण्याचा यशस्वी प्रयत्न आपण गेल्या सहा-सात महिन्यांत केला व त्यात यश येऊ लागल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना वाटते.
केंद्रातील संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पर्रीकर हे गेल्या मार्चमध्ये गोव्यात परतले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दि. 15 मार्चपासून काम सुरू केले होते. भाजपसह गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे या सरकारचे घटक आहेत. गोवा भाजपचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या सरकारचे शिल्पकार ठरले होते. गेली सात महिने पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे यशस्वी नेतृत्व केले.
राजकीय अस्थैर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात भिन्न प्रवृत्तीच्या पक्षांना घेऊन आघाडी सरकार चालविणे हे मोठे कसरतीचे काम असते. गोवा राज्य आर्थिक अडचणीत असताना देखील केंद्र सरकारच्या सहकार्याने पर्रीकर यांनी आतापर्यंत गोव्याच्या कारभाराचा गाडा पुढे ओढला आहे. गडकरी यांनी गोव्याला गेल्या सात महिन्यांत पंधरा हजार कोटींचे साधनसुविधाविषयक प्रकल्प दिले आहेत.
पर्रीकर हे गेल्या सहा-सात महिन्यांतील कामाविषयी बोलताना म्हणाले की सुमारे बाराशे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हंगामी बढत्या गेल्या सहा महिन्यांत कायमस्वरूपी झाल्या आहेत. सर्व पोलिस उपाधीक्षकांच्या बदल्या कायम झाल्या आहेत. यापूर्वी हे सगळे कायम हंगामी बढतीवरच राहत होते. सर्वांनी सहनशीलता ठेवली तर खूप काही शक्य होते. आम्ही प्रशासनाला आकार देण्यासाठी पाऊले उचलली व त्याचे चांगले फळ आता दिसू लागले आहे. दरम्यान भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नुकताच एक ठराव मंजूर केला गेला व पर्रीकर सरकार विविध आघाड्यांवर करत असलेल्या कामांबाबत गौरवोद्गार काढण्यात आले.