लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : न्यायालयाने आठवड्यातून एकदा मुलाला माझी भेट घालून देण्याचा आदेश सूचनाला दिला होता. मात्र, तो सूचनाला मान्य नव्हता. म्हणूनच गेल्या पाच रविवारी तिने मला व चिन्मयला भेटू दिले नाही, तर सहाव्या रविवारी तिने चिन्मयला गोव्यात आणून त्याचा खून करून सगळंच संपवले. हे सांगताना व्यंकटरमण यांना अश्रू अनावर झाले.
गोव्याला हादरवून सोडणाऱ्या चिन्मय याच्या खून प्रकरणात काल, शनिवारी वडील व्यंकटरमण यांची कळंगुट पोलिसांनी जबानी घेतली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. कळंगुट पोलिसांनी ४ तासांहून अधिकवेळ व्यंकटरमण यांची चौकशी केली. तसेच काहीवेळ दोघांना एकमेकांच्या समोर उभे करून चौकशीही करण्यात आली.
सूचनाचे पती व्यंकटरमण शनिवारी सकाळी आपल्या वकिलासोबत चौकशीसाठी कळंगुट पोलिस स्थानकात पोहोचले. त्यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात तपासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अनेक गोष्टी समोर आल्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले. दोघांतील नात्यांवरील अनेक प्रश्न चौकशीदरम्यान त्याला विचारण्यात आले होते. दरम्यान, सूचनाला दिलेला ६ दिवसांचा रिमांड उद्या, सोमवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे तिची कोठडी वाढवून घेण्यासाठी पणजीतील बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने रिमांडासाठी बाल न्यायालयात नेण्यात येईल.
निर्दयी आईने केला खून; पित्याकडून अंत्यसंस्कार
खून करून आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह तिने बॅगेत घालून बंगळूरुला सूचना निघाली. मात्र, ि केलेले कृत्य काही तासांतच समोर येत तिला अटक करण्यात आली. सूचनाला आयमंगला येथून गोव्यात आणले, तर मुलाचा मृतदेह शवचिकित्सेनंतर वडिलांच्या ताब्यात देण्यात आला, त्यानंतर वडील व्यंकटरमण यांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
'त्या' निर्णयाने सूचना नाराज झाली
न्यायालयाने सुरुवातीला व्यंकटरमण यांना मुलगा चिन्मयला दोन आठवड्यांत एकदा भेटण्याची अट घातली होती. त्यानंतर २० नोव्हेंबर २०२३ पासून दर रविवारी पूर्ण दिवस भेटण्याची परवानगी दिली होती. या आदेशावर सूचना प्रचंड नाराज झालेली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सूचनाच्या सोयीच्या ठिकाणी व्यंकटरमण आपल्या मुलाला बहुतेक वेळा कॉफी शॉपमध्ये भेटत होता, अशी माहिती अॅड. अझर मीर यांनी दिली.
'त्या' टिश्शू पेपरवर....
माझ्या मुलाची कस्टडी देण्यासाठी न्यायालय आणि माझे पती माझ्यावर दबाव आणत आहेत. मी आता हे सहन करू शकत नाही. माझा विभक्त पती हिंसक आहे. तो मुलाला वाईट संस्कार शिकवेल. मी खूप अपराधी आणि निराश आहे. मी माझ्या मुलावर प्रेम करते, पण मला माझ्या मुलाला त्याच्या वडिलांजवळ जाऊ द्यायचे नाही, असे सूचनाने आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिले आहे. सध्या ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.