लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सूचना सेठ हिने आपल्या चार वर्षाचा मुलगा चिन्मय याचा खून करण्याच्या काही दिवस आधी गोव्याला भेट दिली होती. ३१ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी असा पाच दिवसांचा मुक्काम करून ती बंगळुरूला परतली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ती पुन्हा गोव्यात आली व मुलाचा खून केला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत सूचना केळशी येथील एका पंचतारांकित हॉटेलात थांबली होती. ४ रोजी ती बंगळुरूला परतली. मात्र, ६ रोजी ती आपल्या मुलासोबत पुन्हा गोव्यात आली व सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. याच हॉटेलच्या खोली क्रमांक ४०४ मध्ये तिने आपल्या मुलाचा खून केला. नंतर मृतदेह बॅगेत भरून ती बंगळुरूला रवाना झाली.
परंतु, हॉटलमधील कामगारांमुळे या खूनाला वाचा फुटली व पोलिसांनी तिला चित्रदुर्ग येथील आयमंगला येथून अटक केली. त्यामुळे खून करण्याच्या उद्देशानेच ती गोव्यात आली होती, असा कयास पोलिसांकडून लावला जात आहे. सूचना ही तपासात सहकार्य करीत नसल्याने कळंगुट पोलिसांनी बाल न्यायालयाकडे तिच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिच्या कोठडीत पाच दिवसांनी वाढ केली आहे.
दरम्यान, सूचनाचे पती व्यंकटरमण यांची डीएनए चाचणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तर सूचनाचीही डीएनए चाचणी लवकरच करण्यात येणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. तसेच १९ जानेवारी रोजी सूचनाची पोलिस कोठडी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.
२०२२ पासून मी चिन्मयला भेटलो नाही
माझ्या मुलाला मला भेटायचे होते; पण सूचनाला हेच आवडायचे नाही. यापूर्वी तिने मला माझ्या मुलाला भेटू दिले नाही. मात्र, हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर मला माझ्या मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. डिसेंबर २०२२ पर्यंत मी माझ्या मुलाला भेटू शकलो नाही; पण न्यायालयाच्या आदेशानुसार मी माझ्या मुलाला जानेवारी २०२४ पासून भेटू शकणार होतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला माझ्या मुलाला भेटायचे होते. पण सूचना त्याला गोव्याला घेऊन गेली. याबाबत तिने कोणालाही सांगितले नाही.
...अन् वाद सुरू झाला
२०१९ मध्ये आम्हाला मुलगा झाला तेव्हापासून सूचनाच्या वागण्यात बदल झाला. माझा मुलगा लहान होता म्हणून मी दुसऱ्या खोलीत झोपू लागलो. मात्र, सूचना या मुद्यावरून माझ्याशी सतत भांडू लागली, मुलाची जबाबदारी मी घेत नाही, असे म्हणायची. या गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि पुढे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.
ती फोन उचलत नव्हती...
७ रोजी मी चिन्मयची वाट पाहत होतो. मी सूचनाला अनेकदा फोनही केला; पण तिने माझा कॉल उचलला नाही. तुम्ही ठीक आहात का? असा मेसेजही केला; पण तिने मेसेजचा रिप्लायदेखील दिला नाही, असे व्यंकटरमण यांनी म्हटले आहे.