लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आपल्या चार वर्षे वयाच्या मुलाचा खून करण्याच्या गुन्ह्यासाठी बंगळूरस्थित एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने जामिनासाठी पुन्हा अर्ज केला आहे. सूचना ही गेल्या १० महिन्यांपासून कोलवाळ येथील तुरुंगात आहे. पती-पत्नीतील वादामुळे जानेवारी महिन्यात मुलाचा बळी गेला होता.
या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सूचना सेठ हिने जामिनासाठी यापूर्वीही अनेक वेळा अर्ज केला होता, परंतु ते अर्ज फेटाळण्यात आले. आता आरोपपत्र दाखल केल्यानंतर तिने पुन्हा जामीन अर्ज दाखल केला आहे. हे प्रकरण मंगळवारी सुनावणीसाठी आले होते, परंतु सरकारी वकिलाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली. ही मुदत न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणी २२ रोजी सुनावणी ठेवली आहे.
बेंगळुरूहून आलेल्या सूचना सेठ हिला ७ जानेवारी २०२४ रोजी कर्नाटकात जाताना पोलिसांनी चित्रदुर्ग येथे अटक केली होती. मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून टॅक्सीतून जात असताना पकडण्यात आले होते. कांदोळी येथे एका हॉटेलमध्ये ती राहायला आली होती आणि आपल्या मुलाची हत्या करून ती ६ जानेवारी रोजी बेंगळुरू येथे जाण्यासाठी निघाली होती, परंतु पुरावा नष्ट करण्यापूर्वीच ताब्यात घेतले होते.