लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपही जोरात चालले आहेत. नव्या घडामोडीत मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हापसा अर्बन बँकेच्या प्रकरणात खलप यांच्यावर थेट हल्लाबोल केला. तर खलप यांनीही त्यांना खुल्या व्यासपीठावर चर्चेला येण्याचे आव्हान दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर यांनी म्हापसा अर्बनचा विषय उपस्थित करुन खलप यांना डिवचले. म्हापसा अर्बन बँकेचे चेअरमन असताना गैरकारभार झाला, याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे विधान केले. काँग्रेस सध्या आपण उच्चशिक्षित उमेदवार दिल्याचा बडेजाव मारत आहे. खलप स्वतःला उच्चशिक्षित म्हणत असतील तर त्यांच्या कारकिर्दीत म्हापसा अर्बन बैंक डबघाईस का आली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला
म्हापसा अर्बन डबघाईस येऊन बंद पडायला आली तेव्हा मी मंत्री होतो. या बँकेचे तसेच मडगाव अर्बन बँकेचे काही दस्तऐवज मी मंत्री या नात्याने मागवले व काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या बँकांनी मनमानी कर्जे दिली होती. खलप हेच म्हापसा अर्बनच्या आजच्या स्थितीला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप ढवळीकरांनी केला.
अॅड. रमाकांत खलप यांनी त्यांना म्हापसा अर्बन'च नव्हे तर कोणत्याही विषयावर खुल्या व्यासपीठावर चर्चेला येण्याचे उघड आव्हान दिले आहे. खलप म्हणाले की, उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काही माझे आव्हान स्वीकारलेले नाही. आता ढवळीकर यांनी माझे आव्हान स्वीकारावे.
मडकई मतदारसंघात काँग्रेस पक्ष नावालाही राहिलेला नाही, तशीच गत या पक्षाची संपूर्ण गोव्यातही होईल. काँग्रेस अखेरच्या घटका मोजत असून या पक्षासाठी गोव्यात लोकसभेची ही अखेरची निवडणूक ठरेल. काँग्रेसचे जे तीन आमदार शिल्लक राहिले आहेत. तेसुध्दा लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जातील, असे विधानही ढवळीकर यांनी केले. या त्यांच्या विधानावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी संताप व्यक्त केला. ढवळीकर यांनी काँग्रेसच्या कारभारात ढवळाढवळ करू नये. त्याऐवजी स्वतःच्या आमदारावर लक्ष ठेवावे, असा सल्ला युरी यांनी दिला.