पणजी : वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात अपयशी ठरलेले वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीपद सोडावे व राजकारणातून संन्यास घ्यावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
डिचोली येथे वीज खांबावर चढून काम करणाऱ्या मनोज जांबावलीकर या तरुण लाईनमनचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. वीज खात्याने मात्र या घटनेची जबाबदारी झटकली. वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे वीज मंत्र्यांना काहीच पडलेले नसून ते केवळ कमिशन घेण्यात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ताम्हणकर म्हणाले की, मागील काही वर्षात वीज खात्याच्या ६० हून अधिक वीज कर्मचाऱ्यांचा अशाच प्रकारे वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतक्या घटना होऊन देखील खाते तसेच वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना काहीच पडलेले नाही. ढवळीकर वीज खात्याकडून हाती घेतलेल्या विकास कामांवर बोलतात. वीज खात्याकडून भूमीगत वीज वाहिन्यांचे काम हाती घेतले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र ते पुरेसे नसून कर्मचाऱ्यांची सुरक्षाही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.