लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'सभापती रमेश तवडकर हे गेली अनेक वर्षे श्रमधाम योजनेमधून गोरगरीबांसाठी घरे उभारत आहेत. ते राजकारणाच्या पलीकडचा विचार करून योजना राबवत असतात. प्रत्येकाने योजनेचे स्वागत करायला हवे' अशा शब्दांत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल तवडकर यांना श्रमधामबाबत पाठिंबा दिला.
अर्थात ढवळीकर यांच्या या पाठिंब्याबाबत लगेच प्रियोळ मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मंत्री ढवळीकर म्हणाले की, 'राजकारणात प्रवेश करायच्या आधीपासून ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या कुटुंबीयांनीसुद्धा अनेक घरे उभारली आहेत. मडकई व प्रियोळ या दोन्ही मतदारसंघात आजघडीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे किमान सहाशे घरे आम्ही लोकांना बांधून दिली असतील. एवढे करूनही श्रमधाम योजनेच्या तुलनेत आम्ही कमी पडतो. ही घरे उभारताना आम्ही कुठेतरी आमच्या मतदारसंघाचा विचार केला. रमेश तवडकर यांनी गोरगरिबांना घरे देत असताना कधीच भौगोलिक विचार केला नाही किंवा राजकारणाचा विचार केला नाही. म्हणूनच त्यांची ही योजना निस्वार्थीपणाची आहे. प्रत्येकाने योजनेला पाठिंबा द्यायला हवा.'
मंत्री ढवळीकर म्हणाले की, 'योजनेसंदर्भात जो विनाकारण वाद निर्माण केला जात आहे, तो चुकीचा आहे. ज्यावेळी रमेश तवडकर प्रियोळमध्ये आले होते, त्यावेळी दीपक ढवळीकरसुद्धा त्यांच्याबरोबर होते. कारण तवडकरांच्या श्रमधाम योजनेतून प्रेरणा घेत दीपक ढवळीकर यांनीसुद्धा योजनेंतर्गत काही घरे बांधून देण्याचा संकल्प सोडला आहे. खरे तर अशा योजना राबवताना राजकारणाच्या पलीकडे विचार व्हायला हवा जो रमेश तवडकर व दीपक ढवळीकर करत आहेत.
उद्या राजकारणापलीकडे विचार करून कोणी गरिबांना घरे बांधून देत असेल तर मी स्वतः त्या कार्यक्रमाचे स्वागतच करेन. तवडकर योजना राबवताना काही मार्गदर्शक तत्वे पाळतात. लोकांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतात हे कौतुकास्पद आहे. आजपर्यंत जे कुणालाच जमले नाही, ते करून दाखवण्याचा प्रयत्न रमेश तवडकर करीत आहेत.'
विश्वजीतचेही मदतकार्य
सत्तरी तालुक्यात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेसुद्धा संकटात सापडलेल्या लोकांना घरे बांधून देतात असे सांगून ढवळीकर म्हणाले की, 'घर नसणे म्हणजे काय हे कोणत्याही गरीब माणसाला विचारा, विश्वजीत राणे हे सत्तरी तालुक्यात गरजूंना स्वतः घरे बांधून देत असताना कुठेच राजकारणाचा विचार करत नाहीत. प्रत्येकाने तवडकर व राणे यांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास राज्यातील खूपशा बेघर लोकांना घरे मिळतील त्यात शंका नाही,' असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.