पणजी : शिवोली येथे वीज खांबावर काम करुन उतरताना जिवंत वाहिनीशी संपर्क येऊन विजेच्या धक्क्याने मरण पावलेला साहाय्यक लाइनमन कृष्णा परवार (३८) प्रकरणात जबाबदार लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यावर २४ तासांच्या आत कारवाई केली जाईल, असे खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
ढवळीकर म्हणाले की, आतापर्यंत वीज खांबांवर काम करताना जेवढे मृत्यू झाले आहेत. त्या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल व दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गुरुवारी शिवोली येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्याबाबतीत मुख्य अभियंत्यांना कारवाईचे सक्त आदेश दिलेले आहेत.’
ढवळीकर म्हणाले की,‘ शिवोलीतील घटनेने मला खूप दु:ख होत आहे. साहाय्यक लाइनमन खांबावरुन काम करुन उतरताना वीज वाहिनीचा स्पर्श होऊन मृत्यू पावला, ही दुर्दैवी घटना आहे. काम करताना विजेचा धक्का लागून लाइनमन मृत्यू पावण्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत. अशा सर्व प्रकरणांमध्ये कनिष्ठ अभियंता तसेच इतर जबाबदार अधिकाय्रांबाबत उच्चस्तरीय समितीकडून १५ दिवसात अहवाल मागवणार व दोषी आढळणाय्रांवर कारवाई करणार, असे ढवळीकर यांनी सांगितले.
शिवोलीतील दुर्घटनेन मरण पावलेल्या परवार याच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची पत्नी किंवा मुले यांना सरकारी नोकरी कशी मिळेल हे पाहणे माझी व मुख्यमंत्र्यांची जबाबदारी राहील व यासंबंधी त्वरित निर्णय घेतला जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले. तसेच, विजेच्या धक्क्याने मरण पावण्याच्या घटना या निव्वळ अपघाताने घडलेल्या आहेत. लोकांनी संयम राखावा. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.