सद्गुरू पाटील ल्ल पणजी ‘मगो’ पक्ष भाजपमध्ये विलीन करा. सुदिन ढवळीकर यांना आम्ही मुख्यमंत्रिपद देतो, असा प्रस्ताव भाजपकडून मगो पक्षाला देण्यात आला होता; पण मगोने तो स्वीकारला नव्हता, अशी माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची संरक्षणमंत्रिपदी निवड झाली, त्या वेळीच पर्रीकर व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मगोच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आला होता.मगोचे भाजपमध्ये विलिनीकरण झाले असते, तर सिंह ही निशाणीही शिल्लक राहिली नसती. केवढीही मोठी आॅफर भाजपने भविष्यातही दिली, तरी मगोचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे, असे मगो पक्षात ठरले आहे. पर्रीकर हे दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर गोव्यातील सरकार अस्थिर होऊ नये किंवा काँग्रेसवाल्यांनी व अपक्ष आमदारांनी सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्रिपदाची आॅफर देऊन सरकार अस्थिर करू नये, असाही विचार गडकरी व पर्रीकर यांनी केला होता. त्यासाठीच अगोदरच मगोचे भाजपमध्ये विलिनीकरण करून घेऊया, असे त्यांनी ठरविले होते. काही मतदारसंघांमध्ये भाजप व मगोचे मतदार समान असल्याने भाजपला विलिनीकरण सोयीचे झाले असते. दीड वर्षापूर्वी पर्रीकर विदेश दौऱ्यावर असताना त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसचे काही आमदार व अपक्ष आमदारांनी मिळून केला होता, हे भाजपचे काही नेते अजून विसरलेले नाहीत.दरम्यान, या प्रतिनिधीने मगोचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक ढवळीकर व आमदार लवू मामलेदार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मगोला विलिनीकरणाची आॅफर होती, या वृत्ताला दुजोरा दिला.
सुदिन ढवळीकरांना होती भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची आॅफर
By admin | Published: May 10, 2015 12:56 AM