नारायण गावसपणजी : संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प लवकर सुरु करावा या मागणीसाठी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा. मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्र्यांकडून यावर स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बसून राहण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला. वेळ पडल्यास मुख्यमंत्री निवासस्थानी धडक देण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेली अनेक वर्षे संजीवनी साखर कारखाना बंद आहे. संजीवनी साखर कारखाना बंद केला यामुळे आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घेऊन हा साखर कारखाना सुरु करा अशी मागणी केली. आता सरकारने या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यालाही आम्ही पाठिंबा दिला. पण अजूनही काहीच झालेले नाही. गेले चार दिवस आम्ही साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले पण कुणीच याची दखल घेतली नसल्याचे आज पणजीतील आझाद मैदानावर न्यायासाठी यावे लागले, असे यावेळी गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
सरकारने सरळ भूमिका घ्यावीसरकारने संजीवनी साखर कारखाना बंद होणार की पुन्हा सुरु करणार याची सरळ भूमिका घ्यावी. भागधारक शेतकऱ्यांना ताटकळत ठेऊ नये. आता लोक शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादन कमी झाले आहे. सरकारने हा कारखाना स्वताही सुरु करत नाही तसेच पीपीपी तत्वावरही अद्याप सुरु कलेला नाही. फक़्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जातात. या साखर कारखान्याचे जवळपास ७०० भागधारक शेतकरी आहेत. जर साखर कारखाना पुन्हा सुरु झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर यावे लागणार आहे, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा भर उन्हात मोर्चाराज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर उन्हात मोर्चा सुरु केला. जय जवान जय किसानचा नारा देत संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यात अनेक महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करते असे सांगितले जाते, पण प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक केली जाते. आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांकडे ठोस आश्वासन मागत आहाेत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही असेही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.