काँग्रेस बळकट करण्यास सुखू गोव्यात; प्रदेशाध्यक्षांसह तिन्ही आमदारांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:57 PM2023-02-13T12:57:26+5:302023-02-13T12:58:18+5:30
गोव्यात काँग्रेसला बळकटी देण्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यात खासगी दौऱ्यावर आलेले हिमाचल प्रदेशचे कॉग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांची प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार कार्लुस फेरेरा आणि आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. गोव्यात काँग्रेसला बळकटी देण्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
हिमाचल प्रदेशमध्ये काही महिन्यांआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर सुखविंदरसिंग सुखू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुखू यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्षबांधणीचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. उत्तम प्रशासक म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे.
त्यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, गोव्यात काँग्रेस तळागाळातील जनतेपर्यंत नेऊन पक्षाला पुन्हा बलशाली बनविण्याच्यात तसेच आगामी लोकसभा आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्या वारंवार बैठका घेण्याचा तसेच सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा सल्ला सुखू यांनी बैठकीत आम्हाला दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"