लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अट्टल गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान हा गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून जाणे ही अचानक घडलेली घटना नसून ते पूर्व नियोजित कारस्थान आहे. कारण पळून जाण्यासाठी त्याने गोवा ते हुबळीपर्यंत व तिथून पुढे टप्प्या- टप्प्यावर माणसे बदलल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका कार चालकास जुने गोवे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. हजरतसाब बावन्नवार (वय ३४) असे त्याचे नाव आहे.
हजरतसाब बावन्नवार याने सुलेमानला आश्रय दिला आणि नंतर आपल्या कारमधून नेल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. कर्नाटक पोलिसांच्या मदतीने हजरतसाब याला अटक करण्यात आली आहे. तसेच पलायनासाठी त्याने वापरलेली कारही जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जाण्याची शक्यता असून पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत.
भू-बळकाव प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याला गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास क्राईम ब्रँचच्या कोठडीतून स्वतःच्या दुचाकीवर बसवून पळवून नेणाऱ्या आयआरबीच्या कॉन्स्टेबल अमित नाईक याची सेवेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशीवेळी अमित नाईक याने सुलेमानने आपल्याला तीन कोटी रुपयांची ऑफर दिल्याची कुबली दिली आहे. ऑफरनुसार त्याने दुचाकीवरून सुलेमानला कर्नाटकात नेऊन सोडले. मात्र पलायन केल्यानंतर सुलेमानने आपल्याला रक्कम दिली नसून त्याने फसवणूक केल्याची माहिती अमित नाईक याने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, पोलीस खात्याच्या लौकिकाला काळीमा फासण्याचे कृत्य केलेला आयआरबीचा कॉन्स्टेबल आता आयआरबीच्या सेवेत राहिलेला नाही. त्याच्या बडतर्फीचा आदेश पोलिस मुख्यालयातून जारी करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. शुक्रवारी अमित हुबळी पोलिस स्थानकात शरण आला. त्यानंतर त्याला तेथून गोव्यात आणण्यात आले. सुलेमानला कुठे नेऊन सोडले? तो आता कुठे लपला आहे, याची चौकशी केली जात आहे. सुलेमान खान हा गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळाला. कॉन्स्टेबल अमित नाईक याने सुलेमानला कोठडीतून बाहेर काढून स्वतःच्या दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत केली. या घटनेने गोत्यात खळबळ माजली.
अमित नाईक सुलेमानला घेऊन दुचाकीवरून बाहेर पडला तो थेट हुबळीपर्यंत गेला. तिथे सुलेमानला नेण्यासाठी हजरतसाब आपली कार घेऊन आलेला. तिथून सुलेमानने अमितला तिथेच सोडून हजरातसाब सोबत पलायन केले. ऑफरनुसार, आपल्याला पैसे दिले नसल्यामुळे निराश झालेल्या अमित नाईक याने जुने हुबळी पोलिस ठाणे गाठले. तिथे जाऊन तो शरण आला. त्यानंतर हुबळी पोलिसांनी गोवा पोलिसांना एक संदेश पाठविला तो संदेश होता 'डिस्ट्रेस्सड गोवा कॉप सरेन्डर्ड'
अमित तीन कोटींना भुलला...
गोवा पोलिस दलाच्या इतिहासात न घडलेला प्रकार कॉन्स्टेबल अमित नाईक याने करण्याचे कसे काय धाडस दाखले हे आता तपासातून उघड झाले आहे. सुलेमानने कोठडीतून बाहेर काढण्याच्या बदल्यात अमितला ३ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती. केवळ गुन्हे शाखेच्या कोठडीतून बाहेर काढायचे नव्हते तर त्याला कर्नाटकच्या हद्दीत नेऊन सोडायचे होते. या मोठ्या ऑफरमुळे अमितने आपला विवेक हरविला आणि गुरुवारी मध्यरात्री त्याने हे घृणास्पद कृत्य केले.
एवढे 'धाडस' केले तरी कसे?
गुन्हे शाखेच्या ज्या कोठडीत सुलेमानला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे आहेत हे अमितला माहिती होते. जे कृत्य त्याने केले आहे ते केल्यावर आपल्याला नोकरी गमावावी लागेल याचीही कल्पना त्याला होती. इतके सर्व माहिती असतानाही त्याने हे धाडस कसे काय केले? सुलेमानने त्याला आणखी कोणती आमिषे दाखवली होती? या पलायन प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे? याची माहिती पोलिस घेत आहेत.
सुलेमान कर्नाटकात
अमित नाईक हुबळीत शरण आल्यानंतर आता सुलेमानचा शोध घेतला जात आहे. अमितने दिलेल्या माहितीनुसार, सुलेमानने आपल्याला कर्नाटक हद्दीत सोडण्यास सांगितले होते. त्यानुसार आपण त्याला सोडले आहे. आता पोलिस सुलेमान याला नेमके कुठे सोडले यावर पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली. सुलेमान कर्नाटकात कुठेही लपला असला तरी तो लवकरच सापडला जाईल. कर्नाटकसह शेजारील राज्यांचे पोलिसांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे.