पणजी : उन्हाची झळ आता भाज्यांनाही बसू लागली आहे. पणजी बाजारात वालपापडी १८० ते २०० रुपये किलो तर मिरची १२० रुपये किलो इतकी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.
उकाडयामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत. लिंबू महागले असतानाच आता भाज्यांवरही वाढत्या तापमानाची झळ बसू लागली आहे. गोव्यात बेळगाव व कोल्हापूर येथून भाजी आयात होते. सध्या तेथील घाऊक बाजारात भाज्या महागल्याने त्याचा थेट फटका येथील किरकोळ बाजारातील भाजी दरांवर होत आहे.
वालपापडीचा दर साधारणता ८० ते १०० रुपये किलो इतका असतो. मात्र अचानक त्याच्या दरात वाढ होऊन तो थेट १८० ते २०० रुपये किलो इतका झाला आहे. तर बारीक हिरवी मिरची सुध्दा ३० रुपये पाव किलो म्हणजेच १२० रुपये किलो या दराने मिळत आहे. उकाडा असाच कायम राहिला तर अन्य भाज्या सुद्धा महागण्याची शक्यता असल्याचे पणजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले.