पणजी: खाण घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना विशेष तपास पथकाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांना एसआयटीच्या रायबंदर येथील कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रॉय नाईक यांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची खाण नाही. तसेच ते खनिज वाहतूकदारही नाहीत. परंतु त्यांचा खनिज घोटाळ््याशी संबंध असल्याचा एसआयटीचा दावा आहे. एसआयटीकडे या संबंधी पुरावे मिळाल्याचाही दावा एसआयटीकडून करण्यात आला आहे. खाण घोटाल्यात त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे एसआयटीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातही त्यांचा उल्लेख नाही, परंतु एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गब्बर खनिज ट्रेडरशी त्यांचा संबंध असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. तसेच खाण घोटाळ््यातील प्रकरणातच त्यांचा सहभाग आढळून आल्याचा दावाही एसआयटीने केला आहे. या विषयी एसआयटीचे अधीक्षक कार्तीक कष्यप यांना विचारले असता त्यांनी रॉय यांच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे तयंनी सांगितले. त्या बाबतीत एवढ्यात वाच्चता करणे योग्य होणार नाही. शुक्रवारी त्यांच्या चौकशीच्यावेळी त्यांनाच या विषयावर प्रश्न केले जातील असे त्यांनी सांगितले.३५० हजार कोटी रुपयांच्या खनिज घोटाळ्याची चौकशी करणा-या एसआयटीकडून अतापर्यंत सहा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. मुख्य प्रकरणातही दोन दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील केवळ १३५ कोटी रुपयांच्या बाबतीत हे आरोपपत्र असून नंतर टप्प्या टप्प्यांने इतर प्रकरणे जोडली जाणार आहेत. रॉय नाईक यांना मुख्य गुन्ह्यातील नेमक्या कोणत्या खाणीच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत हेही एसआयटीकडून अद्याप स्पष्ट केलेले नाही. रॉय नाईक हे अलिकडेच राजकारणात सक्रीय झाले आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा फार मोठा पराभव झाला होता.
गोव्यात कॉंग्रेस आमदार व आमदाराच्या पुत्राला समन्स, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 10:27 PM