पणजी: वागातोर येथे 28 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स पार्टी रात्री लवकर बंद होण्याची अपेक्षा आता कुणी करू नये. कारण दहा ऐवजी 12 पर्यंत परवानगी या पार्टीसाठी मागितली तर ती द्यावी लागेल असे खुद्द गोव्याचे पर्यावरण मंत्री अलेक्स सिकवेरा यांनी म्हटले आहे.
नियमाप्रमाणे रात्री दहा वाजता लाऊड स्पीकर थांबले पाहिजेत. रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर वाजविण्यास बंदी आहे. काही विशेष कारणासाठी सवलत देऊन ही मुदत रात्री 12 पर्यंत केली जाऊ शकते. जत्रा, लग्न पार्ट्या यासारख्या कारणासाठी ही सवलत दिली जाते. मात्र या सवलतीचा पार्टीसाठी वापर करायचे आयोजकांनी ठरवले तर ते त्यांना सहज शक्य होणार आहे. याविषयी पर्यावरण मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले की ध्वनीक्षेपके लावण्याची मुदत रात्री बारापर्यंत वाढविणे कायद्यानुसार शक्य आहे. आयोजकांनी तसा अर्ज केला तर त्यांना ही सवलत द्यावी लागणार आहे. मात्र अजून पर्यंत असा अर्ज आलेला नाही असेही मंत्र्यांनी म्हटले आहे.
मंत्र्यांच्या या विधानामुळे सनबर्न पार्टीच्या आयोजकांना रात्री उशिरापर्यंत पार्टी चालविण्यास हिरवा कंदील मिळणार असे संकेत आहेत. सनबर्न पार्टी रात्री उशिरापर्यंत चालते आणि या पार्टीत मोठ्याने क्षेपके वाजवली जातात. त्यामुळे स्थानिकांना त्रास होतो, अशा तेथील स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत. अशाच तक्रारी घेऊन तेथील एक दिव्यांग मुलगा न्यायालयातही गेला होता. सरकारने या मुलाच्या समस्या ऐकाव्यात आणि त्यावर तोडगा काढावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपके वाजवण्यास या पार्टीच्या आयोजकांना मोकळी दिली जाणार असल्यामुळे या मुलाने आता कुणाकडून अपेक्षा करावी असा प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे.