पणजी: ३१ डिसेंबर रोजी सनबर्न होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करुनही सरकारच्या निर्णयाला न जुमानता आयोजकांनी सनबर्नच्या तिकिटांची विक्री सुरु केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेता ॲड. अमित पालकर यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी त्याची दखल घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी ३१ डिसेंबर रोजी सनबर्न महोत्सव होणार नाही असे आश्वासन देऊनही त्यासाठी तिकिट विक्री होत आहे. त्यामुळे सनबर्न खरेच इतका मोठा आहे का असा प्रश्न उपस्थित होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सनबर्न आयोजकांनी या महोत्सवासाठीच्या सर्व दिवसांच्या तिकिटांची विक्री करीत आहे. यावरुन सनबर्न आयोजक हे गोमंतकीयांना तसेच गोव्याच्या राजकारण्यांना गृहित तर धरत नाहीत ना ? असा प्रश्नही ॲड. पालेकर यांनी विचारला आहे. उत्तर गोव्यातील वागातोर येथे २८,२९,३०,३१ डिसेंबर रोजी हे सनबर्न होणार होते. मात्र ३१ डिसेंबर रोजी स्थानिकांना अडचण होऊ नये यासाठी सरकारने त्यादिवशी हा महोत्सव होणार नसल्याचे जाहीर केले आहे.